नव्या वादाला तोंड फुटणार

179

स्वारगेट-कात्रज रस्ता नेमका कोणाचा?

शासन म्हणते महामार्ग; पालिका म्हणते हा आमचा रस्ता

पुणे – गेल्या 11 वर्षांत महापालिकेकडून वाहतूक नियोजनाच्या नावाखाली दरवर्षी तब्बल 20 ते 22 कोटी खर्च केला जाणारा स्वारगेट-कात्रज रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात आहे का पालिकेच्या यावरून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे.

हा रस्ता 20 नोव्हेंबर 1967 पासून पालिकेच्या ताब्यात असल्याचा लेखी खुलासा महापालिकेने केला आहे. तर शासनाकडे धनकवडीतील एका आरक्षित जागेबाबत झालेल्या सुनावणी आदेशात हा कात्रज-स्वारगेट हा पुणे-सातारा महामार्ग असल्याचे नमूद केले आहे.

कशामुळे निर्माण झाला आहे संभ्रम महापालिकेच्या ऑगस्ट महिन्याच्या मुख्यसभेसाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी स्वारगेट ते कात्रज रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचआय) अखत्यारित आहे का असा प्रश्‍न उपस्थित केला होता.

त्याला उत्तर देताना, प्रशासनाने हा रस्ता 1967 पासून पालिकेच्या ताब्यात असून या रस्त्यावर विकासकामे करताना एनएचआयची कोणतीही परवानगी घेणे गरजेचे नसल्याचे नमूद केले आहे. मात्र, त्याच वेळी धनकवडी येथील स.नं 29/अ/2/4/5/4 या जागेवर महापालिकेच्या विकास आराखड्यात मंडई आणि पोलीस चौकीसाठी आरक्षित असलेल्या जागेबाबत जागामालकांनी केलेल्या तक्रारीनुसार शासनाच्या नगर विकास विभागाकडे झालेल्या सुनावणीचा निकाल देताना, ही जागा पुणे-सातारा महामार्गाच्या परिसरात आहे, असे म्हटले आहे.

महापालिकेने दिलेली उत्तरे व राज्यशासनाच्या आदेशातील माहिती पाहता या दोन्हीमध्ये तफावत आहे. शासन या रस्त्याला अद्यापही महामार्ग म्हणत असेल तर महापालिकेने या रस्त्यावर एवढा खर्च केलाच कसा असा प्रश्‍नही आहे. तसेच हा रस्ता अद्यापही महामार्ग असेल तर यावर काम करण्यासाठी महापालिकेने एनएचआयची परवानी का घेतली नाही याचा खुलासा करावा.

– विशाल तांबे, माजी स्थायी समिती अध्यक्ष