फेसबुक मैत्रिणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार

35

लोणी काळभोर – घरगुती वाद झाल्याने पतीस सोडून आईच्या घरी राहत असलेल्या महिलेशी फेसबुकवरून मैत्री केली व त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने लग्नाबाबत विचारणा केली असता भांडण करून तिचे नग्नावस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमित सुनील सायकर (रा. सायकरवाडी, फुरसुंगी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 वर्षीय पीडित महिलेची जुलै 2018मध्ये फेसबुकवरून तिची मैत्री सुमित सायकर याच्याशी झाली. नोव्हेंबर 2018मध्ये त्याने तिला ऊरूळी कांचन येथे एका लॉजवर नेले व लग्न करणार असे सांगून शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

यानंतर वारंवार याची पुनरावृत्ती झाली. मार्च 2019मध्ये तिचे घरी कोणी नसताना त्या दोघांनी संबंध ठेवल्यानंतर लग्न कधी करणार? अशी विचारणा पीडितेने केली असता त्याने कारणे सांगून टाळाटाळ केली.

त्यामुळे तिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्यचा प्रयत्न केला. यावेळी त्यानेच तिला रूग्णालयात दाखल केले व पोलिसांना सांगू नकोस आपण लग्न करू असे सांगितले. हा प्रकार सुमितच्या घरी समजला. त्याच्या घरच्यांनी तिच्या मामाला धमकी दिली. मामाने तिला मारहाण केली म्हणून तिने पुन्हा औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी त्याच्या घरच्यांनी पैसे देतो मिटवून घ्या, असे सांगितले. तिला रुग्णालयातून घरी आणलेनंतर आईने त्याच्या नातेवाईकांना लग्नाबाबत विचारले असता फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यामुळे आलेल्या नैराश्‍यातून तिने पुन्हा विषारी औषध पिले. यावेळी तिला ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले. तेथून आल्यानंतर तिने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.