राज ठाकरेही ‘ईडी’च्या रडारवर?

36

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात देशव्यापी वातावरण निर्मितीसाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नऊ ऑगस्टला क्रांतीदिनी होणाऱ्या ईव्हीएमविरोधी मोर्चासाठी निमंत्रण देण्यासाठी पश्चिम बंगालला पोहोचले. त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन निमंत्रण दिले.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपविरोधात राज यांनी रान उठवले होते, पण त्यांच्या पक्षाचे उमेदवारच नसल्याने त्याचा फारसा परिणाम होऊ शकला नाही. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची डोकेदुखी नाकारता येत नाही. दरम्यान, एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार राज ठाकरे सक्तवसुली संचलनालयाच्या रडारवर असल्याची माहिती आहे.  या वृत्तानुसार त्यांना लवकरच ईडीकडून समन्स बजावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार कोहिनूर मिल क्रमांक तीनच्या व्यवहारामध्ये राज यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या व्यवहारावरून राज ईडीच्या यादीमध्ये असल्याची चर्चा आहे. राज यांचा पक्षाचा मुंबई-पुणे-नाशिक मध्ये प्रभाव आहे. या पटट्यात सत्ताधारी भाजपकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर राज यांची तोफ नियंत्रित करणासाठीही प्रयत्न सूरू आहेत.दरम्यान, ईडीने कोहिनूर सीटीएनएलचे मुख्य वित्त अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला आहे. पुढील टप्पा म्हणून राज यांना समन्स बजावण्यात येणार आहे.