नरेंद्र मोदींच्या सर्वात मोठ्या विरोधकाची भेट घेणार राज ठाकरे

38

मुंबई  : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आता आणखी आक्रमक भूमिका घेण्याची तयारी केलीय. EVMच्या मुद्यावरून राज ठाकरे हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. 1 ऑगस्टला कोलकात्यात ही भेट होणार असून त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सध्याच्या राजकारणात ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात मोठ्या राजकीय विरोधक समजल्या जातात. राज हे आता त्यांचीच भेट घेणार असल्याने ही नव्या समिकरणांची नांदी समजली जातेय.

लोकसभा निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीसाठी त्यांनी जाहीर सभा घेत महाराष्ट्रात नवं वादळ निर्माण केलं. त्यांच्या सभांची दखल देशपातळीवर घेतली गेली आणि राज हे मोदी विरोधकांच्या रांगेत जाऊन बसले.

आत्तापर्यंत परप्रांतियांच्या भूमिकेमुळे मनसे आणि राज ठाकरे यांना देशपातळीवर खलनायक म्हणूनच पाहिलं गेलं. इतर राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी त्यांच्यावर कायम कडाडून टीका केली. 2014 च्या मोदी यांच्या विजयानंतर राजकारणाची सर्वच समिकरणं बदली. भाजप ऐका बाजूला आणि इतर सर्व पक्ष एका बाजूला असं समिकरण तयार झालं.

राष्ट्रीय पातळीवर अस्पृश्य असलेले आणि कधी काळी मोदींचे कट्टर समर्थक असलेले राज ठाकरे हे कट्टर मोदी विरोधकांच्या तंबूत दाखल झालेत. आता EVMचा मुद्दा घेऊन राज हे देशपातळीवर वातावरण तापविण्याचा प्रयत्न करताहेत.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि EVMविरोधात तक्रार केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसचा मनसेला असलेला विरोधही मावळला गेला. आता ममता बॅनर्जी यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण आणखी तापणार आहे.