आरोहण सोशल इनोव्हेशन पुरस्कार २०१९ साठी अर्ज करण्याचे इन्फोसिस फाउंडेशनचे आवाहन

36

भारतात सोशल इनोव्हेशनला गती देण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी

बंगळुरू : इन्फोसिसचे दातृत्व आणि कॉर्पोरेट सामाजिक दायित्व अंग असलेल्या इन्फोसिस फाउंडेशनने द्वितीय आरोहण सोशल इनोव्हेशन पुरस्कारांची आज घोषणा केली. सन २०१८ साली सुरू केलेल्या या पुरस्कारांना पहिल्या वर्षी मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर इन्फोसिस फाउंडेशनने सामाजिक क्षेत्रातील कल्पकतेला चालना देण्याची आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे. भारतातील वंचित घटकांच्या जीवनमानावर मोठ्या प्रमाणावर सकारात्मक परिणाम करणारे उपाय शोधून काढणाऱ्या व्यक्ती, गट अथवा सेवाभावी संस्थांना ओळख मिळवून देऊन त्यांचा गौरव करणे हे या पुरस्कारांचे ध्येय आहे.

द्वितीय आरोहण सोशल इनोव्हेशन पुरस्कारांची घोषणा करताना इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती सुधा मूर्ती म्हणाल्या, “आरोहण सोशल इनोव्हेशन पुरस्कार २०१८ला भरघोस यश मिळाले. इन्फोसिस फाउंडेशनच्या या उपक्रमाला सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशभरातील कल्पक संशोधक व संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि अंतिमतः आघाडीचे १२ संशोधक/संस्थांना गौरवण्यात आले. आपल्या ध्यासाला, संशोधनाला पंख देऊन देशातील लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी व्यासपीठ मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेले संशोधक भारतात मोठ्या प्रमाणावर आहेत, या गोष्टीवरील माझा विश्वास या पुरस्कारांना मिळालेल्या प्रतिसादामुळे दृढ झाला आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून देशभरातील सामाजिक संशोधन क्षेत्रातील छुपी गुणवत्ता हुडकून या संशोधकांच्या स्वप्नांना बळ मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे.”

खालील सहा श्रेणींसाठी पुरस्कार अर्ज स्वीकारले जातील

१. आरोग्य

२. ग्रामीण विकास

३. निराधारांची सेवा

४. महिला सुरक्षा व सक्षमीकरण

५. शिक्षण व क्रीडा

६. शाश्वतता

ठळक वैशिष्ट्ये :

• दुसऱ्या वर्षीच्या पुरस्कारांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ जुलै २०१९ पासून सुरू होणार असून ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहाणार आहे.

• भारतात राहाणाऱ्या प्रौढ व्यक्ती (१८ वर्षांवरील) पुरस्कारांसाठी पात्र.

• या प्रक्रियेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कामाचे वर्णन करणारा व्हिडिओ बनवून आरोहण सोशल इनोव्हेशन पुरस्कारांच्या वेबसाइटवर अपलोड करू शकतात.

• अर्ज दाखल करताना प्रकल्पाला संपूर्ण तपशील देणे आवश्यक असून केवळ संकल्पना, कल्पना अथवा प्रतिकृती स्वीकारल्या जाणार नाहीत. तसेच, व्यावसायिक तत्तावर सुरू असलेला प्रकल्प पुरस्कारासाठी सादर करता येणार नाही.

या पुरस्कारांच्या माध्यमातून विजेत्यांना तांत्रिक मार्गदर्शनासाठी आयआयटी, हैदराबाद कँपसमध्ये १२ आठवडे राहाण्याची संधी मिळणार असून त्या माध्यमातून आपल्या प्रकल्पाचा आणखी विकास करून त्याचा स्तर वाढवता येणार आहे.

प्रतिष्ठित परीक्षकांची फळी प्रकल्पांची छाननी करून विजेत्यांची निवड करणार आहे. अर्जांची छाननी पुढील पाच ढोबळ निकषांच्या आधारे केली जाणार आहे – सामाजिक समस्या अथवा गरजेची सोडवणूक करण्यासाठी होणारा उपयोग, तंत्रज्ञानाचा कल्पक वापर, कल्पनेची अस्सलता, वापरातला सोपेपणा आणि सादरीकरणातील गुणवत्ता. परीक्षकांमध्ये आयआयएम, बंगलोरचे माजी अधिष्ठाता प्रो. त्रिलोचन शास्त्री, भारतीय खेळण्यांचे संशोधक आणि विज्ञानतज्ज्ञ पद्मश्री श्री. अरविंद गुप्ता, आयआयएम अहमदाबादचे अर्धवेळ अध्यापक, तळागाळातील कल्पक संशोधन क्षेत्रातील प्रख्यात अभ्यासक आणि हनी बी नेटवर्कचे संस्थापक प्रो. अनिल गुप्ता, आयआयटी हैदराबादच्या टीचिंग लर्निंग सेंटरचे समन्वयक आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाचे अध्यापक प्रो. जीव्हीव्ही शर्मा, इन्फोसिसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि विपणन विभागाचे जागतिक प्रमुख श्री. सुमित विरमाणी आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष व प्रख्यात लेखिका श्रीमती सुधा मूर्ती यांचा समावेश आहे.

आरोहण सोशल इनोव्हेशन पुरस्कार, अर्ज प्रक्रिया आणि निवडीच्या निकषांच्या अधिक माहितीसाठी www.infosys.com/aarohan या संकेतस्थळाला भेट द्या.