स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा देशवासियांना संदेश

18

नवी दिल्ली: ७२ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्राला संबोधित केले. आपल्या संदेशामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी “शेतकरी व सैनिक आपल्या देशासाठी महत्वपूर्ण योगदान देत आहेत. देशाचे सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून स्वातंत्र्याचे रक्षण करत आहेत.” असे सांगितले. राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करण्याची ही दुसरी वेळ आहे. ‘१५ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रनिर्माणासाठी घेण्यात आलेल्या संकल्पपूर्तीचा आहे. देशाच्या विकासामध्ये हातभार लावत सर्वांनीच गरिबी निर्मूलनासाठी काम करणे गरजेचे आहे.’ असे देखील ते म्हणाले.

‘महिलांच्या स्वातंत्र्यासाठी काम करणे ही देखील आपली जबाबदारी असून त्यांना कुटुंबामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला पाहिजे. महिलांना शिक्षण व आरोग्यासाठी स्वातंत्र्य देणे ही गरज आहे. देशामधील वातावरण बदलत आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील भारत बनवण्याचे काम सुरु आहे’ असा संदेश त्यांनी देशवासियांना दिला.