2018 साठीचे पत्रकारिता पुरस्कार घोषित

36

यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार

मुंबई  – पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा 2018 या वर्षासाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली. पत्रकार यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोईफोडे हा राज्य पातळीवरील अग्रलेखन पुरस्कार जाहीर झाला.

51 हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. शनिवार (दि.27 जुलै) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

मालकर यांना दैनिक दिव्य मराठी, दैनिक तरुण भारत, नागपूर, दैनिक तरुण भारत, बेळगाव, दैनिक प्रभात, पुणे, दैनिक प्रहार, मुंबई आणि अर्थपूर्ण मासिकात गेली काही वर्षे “आर्थिक साक्षरता, बॅंकिंग आणि डिजिटल व्यवहार’ याविषयी केलेले लेखन आणि त्यांनी या विषयावर केलेले जनजागरण यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. अर्थपूर्ण मासिकाचे ते संस्थापक संपादक असून अर्थकारण आणि अर्थक्रांतीच्या प्रसारासाठी हे मासिक पुण्यातून गेली 9 वर्षे प्रसिद्ध होत आहे.