केवळ संतांनी लिहिलेल्या आध्यात्मिक ग्रंथांतून सात्त्विकता प्रक्षेपित होते !

243

व्यावहारिक विषयांवर पुस्तके लिहिण्याएवढे आध्यात्मिक विषयावर ग्रंथ लिहिणे सोपे नाही. याचे कारण ‘अध्यात्म हा विषय सूक्ष्मातील (म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील) असल्याने आध्यात्मिक ग्रंथांच्या लेखकाला सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते’, हे आहे. सूक्ष्म ज्ञान असणार्‍या लेखकाच्या साहित्यामध्ये समाजमनाला अध्यात्माबद्दल प्रभावित करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे केवळ संतांनी लिहिलेल्या आध्यात्मिक ग्रंथांतून सात्त्विकता प्रक्षेपित होते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांनी केले. ग्रॅनडा, स्पेन येथे 6 जुलै 2019या दिवशी संपन्न झालेल्या ‘पुस्तके, प्रकाशन आणि ग्रंथालय’ यांसंदर्भातील 17 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या. Books, Publishing & Libraries Research Network and Common Ground Research Networks, University of Illinois Research Park यांनी आयोजित केलेल्या परिषदेत सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांनी शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधाचे लेखक महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत.

सौ. द्रगाना किस्लोव्हस्की पुढे म्हणाल्या की, ‘एका प्रयोगात ३ गटांतील लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांची आध्यात्मिक स्तरावरील गुणवत्ता ऊर्जा आणि प्रभामंडळ मापक यंत्र, तसेच सूक्ष्म परीक्षण यांच्या आधारे तपासण्यात आली. दोन्ही प्रकारे केलेल्या अभ्यासात संतांनी लिहिलेल्या ग्रंथातून अत्याधिक प्रमाणात सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे दिसून आले. ‘सामान्य व्यक्ती’ आणि ‘भोंदू गुरु’ या अन्य दोन गटांतील लेखकांनी (जे नकारात्मक स्पंदनांच्या प्रभावाखाली होते) लिहिलेल्या पुस्तकांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे स्पष्ट झाले.’

‘आध्यात्मिक ग्रंथाचा लेखक जर संतपदापेक्षा न्यून (कमी) आध्यात्मिक पातळीचा असेल, तर त्याच्या लिखाणामागील हेतू बहुतांश वेळा लोकेषणा किंवा अर्थाजन हा असतो.जर लेखकाचा हेतू व्यावहारिक असला किंवा आध्यात्मिक तत्त्वांच्या विरुद्ध असला, तर त्याला ईश्‍वराचे साहाय्य मिळत नाही. नकारात्मक स्पंदने लेखकांच्या अशा व्यावहारिक महत्त्वाकांक्षांचा लाभ घेऊन त्याला आपल्या रज-तम विचारांनी प्रभावित करून त्याच्या ग्रंथाच्या माध्यमातून समाजाची दिशाभूल करायचा प्रयत्न करतात. संतांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिदिन आध्यात्मिक साधना केल्याने पुस्तकांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांना आपण अचूक ओळखू शकतो. यायोगे आपण भोंदू गुरूंकडून फसले जाण्यापासून वाचतो’, असेही सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांनी सांगितले.

श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, 

संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

संपर्क : 9561574972