राज्यात पाऊस परतला

130

पुणे – गेले तीन ते चार आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर हजेरी लावली आहे. सोमवारपासून राज्यात सर्वत्र चांगला पाऊस सुरू झाला आहे. मान्सूनसाठी आवश्‍यक पोषक वातावरण निर्माण झाल्यानेच पुन्हा पावसाला सुरूवात झाली असून ही स्थिती गुरुवारपर्यंत राहणार आहे, असे हवामान खात्याने कळविले आहे. दरम्यान, रविवारपासूनच श्रावण सुरू झाला आणि पाऊस परतल्याने समाधानाचे वातावरण आहे.

जुलैमध्ये झालेल्या पावसानंतर मोठी उघडीप दिली होती. त्यामुळे चिंतेचे वातावरण होते. पण, रविवारपासून पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे. त्याचबरोबर विदर्भातही पावसाला सुरूवात झाली आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पश्‍चिमेकडे पंजाबच्या अमृतसरपासून पूर्वेकडे बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर ओडिशा आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, सोमवारी सकाळी उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्यामुळे विदर्भात तसेच मराठवाड्यात ही पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज आहे. विदर्भात सध्या अनेक भागात पाऊस पडेत आहे. हे क्षेत्र मंगळवारी तीव्र सक्रीय झाल्यास विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे मान्सून सक्रिय होऊन सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तमिळनाडूमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे; तर उत्तर भारतात उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातही जोरदार पावसाची शक्‍यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये समुद्र खवळण्याची शक्‍यता असून, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.