गरिबीमुळे ‘त्या’ पोचतात कुंटणखान्यात

214

पुणे – कोलकता व बांगलादेश यांच्या सीमारेषेजवळ सुरेखा मंडल (नाव बदलले आहे) हिचे गाव. घरी हलाखीची परिस्थिती. गावात कधीतरी शंभर-सव्वाशे रुपयांचा रोजगार मिळायचा. त्यातच पाच-सहा जणांचे पोट भागविताना या मुलीचे हृदय अक्षरशः पिळवटायचे. मग कोणीतरी पुणे, मुंबईत नोकरी मिळवून भरपूर पैसे कमविण्याचे आमिष दाखवितो. गरिबीचा गैरफायदा घेऊन सुरेखासारख्या तरुणींना पुण्या-मुंबईसारख्या शहरातील कुंटणखान्यात येण्यास भाग पाडले जाते. इथे पैसे मिळत होते; पण नरकयातनाही तितक्‍याच होत्या. अखेर त्यांची तिथून सुटण्याची धडपड सुरू झाली आणि एक दिवस पोलिसांच्या मदतीने त्या नरकयातनेतून बाहेर पडल्या!

बुधवार पेठेतील कुंटणखान्यामध्ये काही तरुणींना जबरदस्तीने डांबून ठेवत त्यांच्याकडून वेश्‍याव्यवसाय करून घेतला जात असल्याची खबर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी संबंधित ठिकाणी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवीत प्रत्येक इमारतीमध्ये अशा तरुणींचा शोध घेतला. त्या वेळीही कुंटणखान्याच्या मालकिणी काही तरुणींना जबरदस्तीने वेश्‍याव्यवसाय करायला लावत असल्याची तक्रार काही तरुणींनी पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांच्या तपासणीमध्ये ५० हून अधिक तरुणींची कुंटणखान्यातून सुटका करण्यात आली. त्यांना त्यांच्या गावाकडे पुन्हा पाठविण्यात आले.

या ‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये सुरेखासारख्या तरुणी केवळ गरिबीमुळे इथपर्यंत पोचत असल्याचे वास्तव उघड झाले. परिस्थिती बदलण्यासाठी हाताला रोजगार, नोकरी मिळेल, या आशेने त्यांनी घर सोडले. ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात येऊन त्या थेट पुण्यातील बुधवार पेठेतील कुंटणखान्यात, तर कधी मुंबईच्या कामाठीपुरामध्ये पोचल्या. तेथे वेगळ्याच जाळ्यात अडकल्याचे भान त्यांना आले. मात्र, उशीर झालेला असे. पुढे कुंटणखाना मालकीण म्हणेन तसेच आणि त्याच पद्धतीने त्यांचे जगणे सुरू होते. त्यातून बाहेर पडण्यासाठी काही तरुणींची धडपड सुरू होती. त्याबाबत पोलिसांना माहिती मिळत गेली आणि त्यांची सुटका झाली.

…आणि त्या अडकतात दलालांच्या जाळ्यात!

मोठ्या शहरात जाण्याच्या, नोकरीच्या इच्छेपोटी अल्पवयीन मुली, अल्पशिक्षित व अविवाहित तरुणी, घटस्फोटित, विधवा महिलांपासून ते विवाहित महिलाही ओळखीच्या व्यक्‍तीच्या गोड बोलण्यास भुलून जातात आणि नकळतपणे इथल्या खोट्या रंगीबेरंगी, चमचमत्या जगात सर्वस्व हरवून बसतात.

कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्याची इच्छा असणाऱ्या तरुणींना रोजगार, नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या ओळखीच्या व्यक्ती, दलाल त्यांना या व्यवसायात आणतात. फसवणूक झाल्याचे लक्षात येते, त्या वेळी त्यांना डांबून ठेवत, त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्‍याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे लक्षात आल्यामुळे आम्ही ‘कोम्बिंग ऑपरेशन’वर भर दिला. त्यातून अनेक तरुणींची सुटका करून त्यांना रेस्क्‍यू होममध्ये पाठवितो.

– किशोर नावंदे, पोलिस निरीक्षक, फरासखाना पोलिस ठाणे.