गणेशोत्सवाचे परवाने महिनाभर आधीच बंद?

193

मुंबईच्या धर्तीवर पुणे महापालिकेची तयारी

पुणे – गणेशोत्सवात रस्त्यांवरील मांडव तसेच इतर परवाने आता मंडळांना गणेशोत्सवाच्या एक महिना आधीपर्यंतच मिळणार आहेत. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुणे महापालिकेकडून मांडवांबाबत न्यायालयाकडून देण्यात आलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात वाहतूक पोलीस आणि महापालिकेची बैठक होणार असून पोलिसांकडे वेळ मागण्यात आली आहे.

गणेशोत्सवात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेश मंडळाकडून मांडव टाकण्यात येतात. त्यासाठी महापालिकेकडून परवानगी दिली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रस्ते अडविणाऱ्या मंडळांनाही परवानगी दिली जात आहे. यावर न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर या प्रकाराची जबाबदारी निश्‍चित करून थेट त्यांच्यावरच कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यासाठी पालिकेने दिलेले परवाने योग्य आहेत, किंवा नाही तसेच मंडळानी परवाने घेऊन त्याबाबत मांडव टाकले आहेत, की नाहीत? याची तपासणी करण्यासाठी तहसीलदारांचे पथकही नेमण्याचे आदेश दिले आहेत.

मागील वर्षी या पथकाने केलेल्या तपासणीत अनेक मांडव अनधिकृतपणे टाकल्याचे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने जबाबदारी निश्‍चित केलेल्या अधिकाऱ्यांची माहिती पालिकेने न्यायालयात दिली आहे. त्यामुळे पुन्हा असे प्रकार घडल्यास अडचण होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पालिकेने या वर्षी परवाने देण्याबाबत कडक धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने नुकत्याच राबविलेल्या धोरणाच्या धर्तीवर अंमलबजावणी केली जाणार आहे. याबाबतची बैठक दि.29 जून अथवा 1 जुलै रोजी होण्याची शक्‍यता आहे.

एक खिडकी योजना जुलैपासूनच : यंदाचा गणेशोत्सव 2 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे महापालिकेकडून परवाने देण्याची प्रक्रिया 2 ऑगस्टपर्यंतच राबविली जाणार आहे. तर परवाने देण्यासाठीची एक खिडकी योजना जुलैपासूनच सुरू केली जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीनंतर एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे. दरम्यान, पुणे शहरातील रस्त्यांची स्थिती तसेच मंडळांची संख्या लक्षात घेऊन ही परवानही एक महिना आधी बंद करण्याऐवजी 15 दिवस आधी बंद करण्याबाबतही निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.