हवेतील प्रदूषण शोषण्यासाठी नियंत्रण यंत्रे कार्यान्वित

144

पुणे – नाशिक महामार्गावर चाकण हद्दीत लायन्सचा उपक्रम

चाकण : दिवसेंदिवस वाढत जाणारी रहदारी आणि महामार्गावरील कित्येक पटीने वाढलेली वाहतूक कोंडी या दुहेरी अडचणींमुळे चाकण शहरात धुळीचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत असताना नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होत असलेला धोका दूर करण्यासाठी येथील चाकण लायन्स क्लबने स्वताहून पुढाकार घेतला आहे. हवेतील धूलिकण शोषून शुद्ध हवा बाहेर सोडणारी यंत्रणा शहरातील अति वर्दळीच्या चार ठिकाणी बसविण्यात आली असून, सुमारे तीन हजार क्युबिक फुट हवा प्रती मिनिटाला शुद्ध होणार आहे.

पुणे – नाशिक महामार्गावर चाकण गावच्या हद्दीतील तळेगाव चौक येथे दोन यंत्रे, आंबेठाण चौक येथे एक यंत्र व माणिक चौक येथे एक यंत्र अशी एकूण चार धूळ शोषक यंत्रणा बसविण्यात आल्याची माहिती चाकण लायन्स क्लबचे अध्यक्ष मधुकर सातव यांनी सांगितले. चाकण मध्ये आहोरात्र सुरु असलेल्या वाहतुकीमुळे अनेक वाहनांतून मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे हा परिसर मोठय़ा प्रमाणात प्रदूषित झाला आहे. धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी ही धूळशोषक यंत्रे बसवण्यात आली असून, यामुळे सुमारे पन्नास टक्के पर्यंत प्रदूषण कमी होईल, असा विश्वास ही यंत्रणा येथे बसविण्यासाठी पुढाकार घेणारे चाकण लायन्स क्लबचे अध्यक्ष मधुकर सातव, सचिव बाळासाहेब मुटके, लक्ष्मण नाणेकर, दिलीप परदेशी आदींनी आवर्जून सांगितले. सदरची यंत्रे बसविण्यासाठी चाकण नगरपरिषदेने विशेष सहकार्य केले आहे. प्रदूषण नियंत्रण यंत्रे येथे बसविणाऱ्या कंपनीचे अमोल चाफेकर यांनी सुमारे तीन हजार क्युबिक फुट हवा प्रती मिनिटाला शुद्ध होईल, असा दावा केला आहे. या यंत्रणेसाठी पुढील काळात दुरुस्ती वा कसलाही खर्च स्थानिक स्वराज्य संस्थाना असणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

“प्रदूषण यंत्र सुमारे पाच फूट उंच आणि अडीच फूट रुंदीचे आहे. या यंत्रामध्ये विशिष्ट पद्धतीने पंख्यांची रचना करण्यात आली आहे. ०.५ अश्वशक्ती ( एच.पी.) क्षमतेच्या मोटार द्वारे वातावरणातील दोन हजार सीएफएम इतकी हवा यात शोषली जाते. मानवी आरोग्यास हानीकारक असलेले हवेतील पी.एम. २.५ ते १० मायक्रॉन आकार मानाचे धूलिकण या यंत्रातील फिल्टरद्वारे शोषले जातात. त्यानंतर शुद्ध हवा बाहेर सोडली जाते.”

–  मधुकर सातव – अध्यक्ष, चाकण लायन्स क्लब, चाकण