खराबवाडी येथे घरात सिलिंडरचा स्फोट

153

किराणा दुकानाचा मालक ठार, तर पाणी पुरीवाल्याची प्रकृती चिंताजनक

चाकण : चाकण – तळेगाव दाभाडे रस्त्यावरील खराबवाडी ( ता. खेड,) गावच्या हद्दीत वर्दळ असलेल्या मध्यवस्तीतील एका राहत्या घरात गॅस सिलिंडरचा जबरदस्त स्फोट होऊन या घटनेत किराणा दुकानाचा मालक जागीच ठार, तर पाणी पुरीवाला गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी ( दि. २७ जून ) पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. खराबवाडी येथील एका इमारतीच्या तळमजल्या वरील राहत्या घरामध्ये घरगुती सिलेंडर मधून रात्रभर झालेल्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या स्फोटा नंतर घरातील अन्न धान्य, गृहपयोगी साहित्य, महत्वाची कागदपत्रे व भाजीपाला जळून खाक झाला. तर कोंडलेल्या स्फोटामुळे खिडक्यांची तावदाने व खिडक्यांसह काचा फुटून लगतच्या खिडक्यांची तावदानेही फुटली आहेत. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पाणी पुरीवाल्याची प्रकृती चिंताजनक असून, तातडीच्या उपचारासाठी त्याला येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

मांगीलाल जीवारामजी चौधरी ( वय – ३५ वर्षे, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. राजस्थान,) असे या विचित्र घटनेत मृत्यू झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तर ओमप्रकाश शंकरलाल लोहार ( वय – २४ वर्षे, सध्या रा. खराबवाडी, मूळ रा. वल्लभनगर, जि. उदयपूर, राजस्थान ) असे या स्फोटात गंभीर भाजलेल्या पाणी पुरी विक्रेत्याचे नाव आहे.  येथील पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, चाकण – तळेगाव दाभाडे रस्त्यावर खराबवाडी ( ता. खेड, जि. पुणे,) येथे मांगीलाल हे किराणा मालाचे दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. गुरुवारी ( दि. २७ जून ) पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण साखर झोपेत असताना ही धक्कादायक व दुर्दैवी घटना घडली. घरगुती सिलेंडर मधून रात्रभर झालेल्या गळतीमुळे हा स्फोट झाला आहे. पाणी पुरीवाला ओमप्रकाश हे पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान झोपेतून उठल्यानंतर त्याने सिगारेट पेटविली असता घरात पसरलेल्या गॅसचा प्रचंड मोठा स्फोट झाला.

यावेळी झालेल्या स्फोटात किराणा दुकानाचे मालक व व्यावसायिक मांगीलाल जीवारामजी चौधरी हे जागीच ठार झाले. तर पाणी पुरी विक्रेते ओमप्रकाश शंकरलाल लोहार हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी अवस्थेत ओमप्रकाश यांना तातडीच्या उपचारासाठी येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, तिथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ओमप्रकाश लोहार हा बुधवारी ( दि. २६ जून ) रात्री उशिरा आपल्या घरातील गॅसवर स्वयंपाक करून गॅस टाकीचे रेग्युलेटर बंद न करता तसाच झोपला होता. त्यामुळे लिक असलेल्या पाइप मधून ज्वालाग्रही गॅस रात्रभर खोलीत पसरला. त्यामुळे ही विचित्र घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत मरण पावलेले व्यावसयिक मांगीलाल चौधरी यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, असा परिवार आहे. या धक्कादायक घटनेने पंचक्रोशीत प्रचंड खळबळ उडाली असून, सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे ही विचित्र घटना घडल्याचे येथील पोलिसांनी सांगितले.

चाकण पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला असून, संबंधित मांगीलाल यांचा मृतदेह ताब्यात घेवून उत्तरीय तपासणी व शवविच्छेदन होताच अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.