कुलवंत वाणी समाजाचा ओबीसीमध्ये समावेश

14

प्रशासकीय निघाला आदेश : नऊ वर्षे संघर्ष

चाकण : महाराष्ट्रातल्या कुलवंत वाणी या समाजाचा प्रलंबित ओबीसी विषयीचा गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. याबाबतचा प्रशासकीय आदेश ( जीआर ) निघाल्याने ओबीसी आरक्षणापासून वंचित असलेल्या कुलवंत वाणी समाजाला न्याय मिळाला आहे. खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

सन २०१० मध्ये एका याचिके वरील निकालामुळे कुलवंत वाणी समाजाला मिळत असलेल्या ओबीसी सवलती बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सातत्याने या समाजाने प्रयत्न करून राज्य मागासवर्ग आयोगाकडुन संपूर्ण महाराष्ट्रात सर्वेक्षण करून याबाबतचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल ऑक्टोबर २०१४ मध्ये राज्य शासनाकडे सादर केला. सन २०१४ पासून मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी मध्ये तातडीची चर्चा होऊन निर्णय होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. परंतु या समाजाकडे कोणतेही राजकीय प्रतिनिधित्व नसल्यामुळे अडचणी येत होत्या. खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी वेळोवेळी या समाजाचे प्रतिनिधींसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून सातत्याने पाठपुरावा केला.

हिवाळी अधिवेशन २०१७ मध्ये याबाबत लक्षवेधी मांडली. त्यानंतर हिवाळी अधिवेशन २०१८ मध्ये सभागृहात यावर सुमारे अर्धातास चौफेर चर्चाही घडवून आणली. या पाठपुराव्यामुळे दि. १ मार्च, २०१९ मध्ये मंत्रिमंडळ उपसमितीने सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेऊन कुलवंत वाणी समाजाला ओबीसी सवलती परत पूर्ववत प्रदान करण्यात याव्यात, असा निर्णय घेतला. याच अनुषंगाने ४ जून, २०१९ रोजी याबाबत प्रशासकीय आदेश (जीआर) देखील निघाला. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून ओबीसी आरक्षणापासून वंचित असलेल्या कुलवंत वाणी समाजाला न्याय मिळाला.

यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील कुलवंत वाणी समाज बांधवांच्या प्रतिनिधींनी चाकण येथे येऊन खेडचेआमदार सुरेश गोरे यांचा नागरी सत्कार केला. याप्रसंगी ओबीसी कृती समितीचे निमंत्रक प्रकाश सिद्ध, बाळासाहेब उर्फ नाना भोरे, हेमंत धावडे, दुर्गाई ह्रदय प्रतिष्ठानचे संस्थापक मामासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे,  प्रशांत गोलांडे, प्रशांत  सिध्द, समीर खडके, अजित तोडकर, राजाभाऊ आरडे, संजय बारसकर, दिपक भगवे, सुनिल दंडे, प्रकाश गोलांडे, रोहित तोडकर, अमित औटी, सचिन खोले, किरण शेटे, गणेश शेटे, दत्तात्रय  कळसकर, राकेश  गोडसे, चाकण, खेड, आळंदी येथील या समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.