चाकणला सहा सावकारांना केले जेरबंद

तीनजण फरार : व्याज आकारूनही देत होते कर्जदाराला धमकी

चाकण : व्याजाने घेतलेले पैसे परत मिळण्यासाठी शिवीगाळ, दमदाटी करून व जीवे ठार मारण्याची धमकी देत जादा पैशांकरिता तगादा लावल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी सहा सावकारांना जेरबंद केले आहे. तर फरारी झालेल्या तिघांच्या शोधासाठी येथील पोलिसांची पथके सर्वत्र रवाना करण्यात आली आहेत. व्याज आकारूनही कर्जदाराला धमकी दिल्या प्रकरणी येथील पोलिसांनी रविवारी ( दि. ९ जून ) एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल केला होता.

माधुरी विशाल सायकर ( वय – २५ वर्षे, रा. रोहकल रोड, चाकण.) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादी वरून येथील पोलिसांनी मंदार परदेशी, रंगा ठोबरे, प्रा. गारगोटे, असलम शेख, सचिन मोहन शेवकरी व दत्ता लक्ष्मण खेडकर ( सर्व रा. चाकण.) यांच्यावर गु.र.नं. ८९६/२०१९ नुसार, भा.द.वि.कलम ४५२, ५०४, ५०६, ३४ अन्वये महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम २०१४ नुसार, ३१, ३२, ४४, ४५ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. सोमवारी ( दि. १० जून ) रात्री उशिरा या सहा सावकारांना जेरबंद करण्यात आले. तर फरारी झालेल्या अन्य तिघांच्या शोधासाठी येथील पोलिसांची पथके सर्वत्र रवाना करण्यात आली आहेत.

याबाबतचे वृत्त असे की, माधुरी सायकर यांचे पती विशाल सायकर यांचे चाकण जवळील एकतानगर येथे ओम शो मेकर्स या नावाचे डेनटिंग व पेंटिंगचे करण्याचे दुकान आहे. गेल्या आठ वर्षांपासून ते हे दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे  त्यांना नेहमीच पैशांची गरज पडत होती. त्यासाठी वरील लोकांकडून सायकर यांनी वेळोवेळी लाखो रुपयां पर्यंत रक्कम व्याजाने घेतली होती. हेच पैसे परत आणि जादा मिळावेत, यासाठी वरील सर्वजण सायकर यांना शिवीगाळ, दमदाटी करून व जीवे ठार मारण्याची धमकी देत पैशांसाठी वारंवार तगादा लावत होते. त्यामुळे वैतागलेल्या सायकर यांच्या पत्नी माधुरी यांनी येथील पोलीस ठाण्यात वरील लोकांविरुद्ध तक्रार दिली होती. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम सूर्यवंशी व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Pune Prahar

पुणे प्रहार

error: Content is protected !!