शेट्टी पडतात आणि शेतकऱ्यांना शिव्या देणारे दानवे निवडून येतात : बच्चू कडू

13

मुंबई : ‘लोकसभा निवडणूकीचे निकाल पाहता सर्वसामान्य माणसाने कोणत्या विचाराने मतदान केले याचे मला नवल वाटले. शेतक-यांसाठी काम करणारा राजू शेट्टींसारखा खासदार पडतो आणि शेतक-यांना शिव्या देणारा रावसाहेब दानवेंसारखा निवडून येतो’ असे म्हणत ‘ही व्यवस्था अशीच चालू राहिली तर आमच्यासारखा कार्यकर्ता टिकणार नाही’ अशी खंत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. सोमवारी जामखेड येथे आयोजित भाषणादरम्यान ते बोलत होते.

यावेळी बच्चू कडू यांनी ऊस प्रश्न, पाणी, दुष्काळ आदी महत्त्वाच्या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरले. ज्या नगरमध्ये उसाच्या भावासाठी लढणा-यांवर गोळ्या चालवल्या जातात त्याच नगरमध्ये कमळ कसे खुलते? असा प्रश्न बच्चू कडू यांनी केला. तसेच भाजप सरकार हे केवळ जाती-धर्माच्या मुद्यावर राजकारण करत असून मूळ मुद्यांपासून लांब पळत आहे असेही ते पुढे म्हणाले. पाण्याच्या एका ग्लासासाठी तुम्हाला वणवण फिरावे लागते. टँकरने पाणीपुरवठा होतो. या मूळ मुद्यांना सोडून सरकार तुमच्या डोक्यांमध्ये जाती-धर्माचे मुद्दे भरवत आहे. तुमच्या डोक्यातून हे मुद्दे जात नाहीत तोपर्यंत शेतकरयांना अच्छे दिन येणार नाहीत, असे बच्चू कडू यावेळी म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि कृती मात्र हैवानाची करायची. अशा लोकांना निवडून देण्याला तुम्हीही तितकेच जबाबदार आहात. इथे भाषणात टाळ्या वाजवता पण मत मात्र भाजपला देता, अशी खंतही बच्चू कडू यांनी व्यक्त केली.