वाहतूक विभागाचा हलगर्जीपणा; एकाची गाडी दिली दुसऱ्यालाच

40

मुंबई – दादर परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली. माहीम विधानसभेचे भाजपचे उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध शेफ तुषार देशमुख यांची टो केलेली ऍक्टिव्हा गाडी वाहतूक विभागाने झा नावाच्या दुसऱ्याच व्यक्तीला दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकारी सुजाता शेजाळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, असा प्रकार घडला होता. मात्र जी व्यक्ती दुचाकी घेऊन गेली होती. ती तणावात होती असून तिने दुचाकी प्रामाणिकपणे परत आणून दिली. मात्र, याबाबत तुषार देशमुख यांनी फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट टाकत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

तुषार यांनी लोकपाशी बोलताना सांगितले की, मी मीटिंगकरिता माझी ऍक्टिव्हा दादर डिपार्टमेंटल स्टोअरबाहेरील रस्त्यावर लावून गेलो होतो. २ वाजता येऊन पाहतो तर गाडी जागी नव्हती. ती वाहतूक विभागाकडून टो करण्यात आली होती. नंतर तसाच मी दादर पोलीस ठाण्याच्या कंपाउंडमध्ये असलेल्या वाहतूक बिट चौकीत गेलो. त्यावेळी त्यांनी मला २५० रुपये दंड आकारला आणि मी भरला. नंतर गाडी देण्याच्या वेळेस माझी दुचाकी दुसऱ्याच व्यक्तीला दिल्याचे समजलं. माझ्या ऍक्टिव्हाचा क्रमांक एमेच ०१, बीसी ७३२३ आहे. मात्र, पोलीस अधिकारी सुजाता शेजाळे यांनी तात्काळ सूत्रं हलवून टो कंपनीच्या मुलांना माहिती विचारून मला माझी ऍक्टिव्हा परत मिळवून देण्यास सहकार्य केले. तरीदेखील मला प्रश्न पडतो वाहतूक विभागाने कोणताही दस्तावेज पडताळून न पाहता माझी गाडी दुसऱ्या व्यक्तीला दिली कशी ? आणि महत्वाचं म्हणजे त्याची चावी माझ्या गाडीला लागली कशी ? ३ ते ५ तास गाडी माझ्याजवळ नव्हती, त्यादरम्यान काही संशयास्पद गोष्ट माझ्या दुचाकीच्या मदतीने घडली असेल तर याला जबाबदार कोण ? असे सवाल निर्माण होत असल्याचं तुषार यांनी सांगितलं. तर पोलीस अधिकारी सुजाता यांनी ज्या व्यक्तीने तुषार यांची गाडी नेली त्यांची देखील ऍक्टिव्हाच गाडी होती असून सफेदच रंगाची होती. ती गाडी त्याच्या तो ज्या ठिकाणी नोकरी करतो तेथील मालकाची असल्याचे त्याने सांगितलं. तसेच तो त्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याने तणावाखाली होता असल्याचे सांगितले.