राम कदमांना साडीचोळी, बांगड्यांचा आहेर

15

पंढरपूर : भाजपचे आमदार राम कदम यांना गुरुवारी पंढरपुरात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. भाजपचे आमदार महिलांचा अवमान करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीने आमदार कदम यांना साडीचोळी आणि बांगड्याचा आहेर देऊन निषेध केला. अलीकडेच गुजरातमधील एका भाजप आमदाराने महिलेला मारहाण करून शिवीगाळ केली होती. तसेच समाजातील इतर महिलांचा अवमानही केला होता.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आज पंढरपुरात बैठक होती. या बैठकीसाठी आमदार राम कदम हे पंढरपुरात आले भक्त निवासात हा प्रकार घडला. ‘आमदार राम कदम..हाय हाय, भाजप सरकार.. हाय हाय’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

राम कदम यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा राज्यभरातून तीव्र निषेध

दरम्यान, ‘तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य आमदार राम कदम यांनी मुंबईत दहीहंडीच्या उत्सवात केले होते. तेव्हा राम कदम यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध नोंदवण्यात आला होता. अनेक जिल्ह्यांत राम कदमांविरोधात आंदोलन करण्यात आले होते. विरोधकांसह सर्वसामान्यांनी राम कदम यांच्या या वादग्रस्त विधानाबद्दल संताप व्यक्त केला असून, त्यांच्यावर महिला वर्गही संतप्त झाला आहे. पुणे, औरंगाबाद आणि मुंबईतून राम कदम यांच्या वक्तव्याचा कडाडून विरोध झाला होता.

सांगलीत प्रतिमेस मारले जोडे

सांगलीत राष्ट्रवादी महिला आघाडीने राम कदम यांचा कडाडून निषेध केला होता. त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून जोरदार निदर्शने केली होती.