‘वयाने मोठा पुरुष साथीदार चालतो मग स्त्री का नाही?’, प्रियांकाचा सवाल

145

प्रेमाला कुठलंही बंधन नसतं असं म्हणतात. कोणत्याही वयात, कोणावरही प्रेम जडू शकतं. प्रेमात पडलेला व्यक्ती साथीदाराच्या जात-पात, धर्म, वय या गोष्टींचा विचार करत नाही. बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केलं. लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही प्रियांका आणि निक यांच्यातील वयाचं अंतर चर्चेचा विषय ठरला. प्रियांका ३६ वर्षांची आहे तर निकचं वय २६ वर्षे आहे. आजपर्यंत प्रियांकाने या चर्चांना उत्तर दिलं नव्हतं. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने वयाच्या अंतरावर ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘पुरुष साथीदार वयाने मोठा असेल तर ते लोकांना चालतं. पण स्त्री वयाने मोठी असेल तर प्रश्न उपस्थित केले जातात. मुलगी वयाने लहान असेल आणि तिचा साथीदार वयाने मोठा असेल तर उलट लोकांना ते आवडतं. मग वयाने मोठी असलेली स्त्री का नाही चालत,’ असा प्रश्न तिने विचारला आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रियांका-निक लग्नाच्या बेडीत अडकले. भारतीय आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर सोशल मीडियावर ही जोडी नेहमीच चर्चेत असते. लग्नासाठी प्रियांकाने सलमान खानचा ‘भारत’ हा चित्रपट नाकारला होता. लग्नानंतर तिने शोनाली बोसच्या ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. याची शूटिंग नुकतीच संपली असून यामध्ये झायरा वसीम, रोहित सराफ आणि फरहान अख्तर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.