संस्थात्मक कार्य उभारण्यासाठी विचार : कृतीत साम्य हवे

138

प्रा. तेज निवळीकर यांचे मत; राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेतर्फे बुद्धपूजा व अभिष्टचिंतन समारंभ  

पुणे : “विचार आणि कृतीत समानता असेल, तरच लोक आपल्यासोबत राहतात. सर्व विचारांच्या लोकांना बरोबर घेऊन संस्थात्मक कार्य उभा राहणे महत्वाचे असते. आज आपण जाती, धर्म, प्रांत किंवा भाषा यांसारख्या मुद्द्यावर एकत्र येतो. मात्र, मानवतेच्या मुद्द्यावर सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे. बंधुतेचा विचार हा माणसांना जोडणारा धागा आहे. सामाजिक कार्याची संकल्पना समजून घेऊन आपल्या जगण्याचा उपयोग समाजाला होईल, याचा विचार करावा,” असे मत प्रसिद्ध व्याख्याते प्रा. तेज निवळीकर यांनी व्यक्त केले.

जेष्ठ साहित्यिक आणि विचारवंत, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त बुद्धपूजा, प्रकाशन आणि अभिष्टचिंतन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळे गुरव येथील बंधुता भवनमध्ये हा समारंभ झाला. यावेळी बौद्धाचार्य प्रकाश गायकवाड आणि राजेंद्र कांबळे गुरुजी यांच्या हस्ते बुद्धरूपाची महापूजा झाली. प्रसंगी ‘पवनेचा प्रवाह’ या विशेषांकाचे प्रकाशनही झाले. भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थाचे संस्थापक प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, सातारा रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्रा. डॉ. अरुण आंधळे, ५ वे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे, कवी अनिल दीक्षित यांच्यासह इतर मान्यवर, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. तेज निवळीकर म्हणाले, “माणसाच्या जगण्याला लांबी, रुंदी आणि उंची या तीन निकषांवर मोजायला हवे. माणूस किती वर्षे जगाला यापेक्षा कसा जगाला याला अधिक महत्व असते. आज समाजात बंधुतेचा विचार रुजविण्याची गरज असून, प्रकाश रोकडे गेली तीन दशके हे काम करीत आहेत. व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सार्वजनिक आयुष्यात अतिशय समाधानी जीवन प्रकाश रोकडे जगले आहेत.

डॉ. अरुण आंधळे म्हणाले, “प्रत्येक माणसांत बंधुतेचे मूल्य रुजविण्यासाठी आपण प्रत्येकाने पुढाकार पाहिजे. जीवनात मूल्यांचे स्थान अढळ आहे. प्रकाश रोकडे यांनी बंधुतेची चळवळ उभी केली. त्यातून अनेक लेखक, कार्यकर्ते घडवले. आता बंधुतेचा विचार पुढे नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.”

प्रकाश रोकडे म्हणाले, “मित्रपरिवाराकडून झालेला हा सत्कार आणखी जोमाने काम करण्यास प्रेरणा देणारा आहे. शेवटच्या श्वासापर्यंत बंधुतेचे मूल्य पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.” डॉ. अशोककुमार पगारिया यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रकाश रोकडे यांच्या मित्र, आप्तेष्टांनी त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. शंकर आथरे यांनी प्रास्तावीक केले. संगीता झिंजुर्के यांनी सूत्रसंचालन केले.