सुप्रिया सु‌ळे झाल्या शहरातही सक्रिय

147

पुणे – खडकवासला मतदारसंघात विरोधी पक्षांना मिळणारे मताधिक्य कमी करण्याच्या दृष्टीने ‘राष्ट्रवादी’च्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने पावले टाकली असून, सोमवारी पालिकेत बैठक घेऊन मतदारसंघातील विविध समस्या सोडविण्याची विनंती त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना केली.

बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. कात्रज, धनकवडी, आंबेगाव, धायरी यासारखा सोसायट्यांनी वेढलेला बहुतांश भाग या मतदारसंघात येतो. गेल्या दोन-तीन निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून विरोधी पक्षांना मताधिक्य मिळत असल्याने येथील छोट्या-छोट्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने सुळे यांनी पहिल्या महिन्यापासूनच पुढाकार घेतला आहे.

या भागातील समस्यांचा पाढाच सोमवारी सुळे आणि ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासमोर वाचला. धायरी परिसरातील पाण्याचा प्रश्न, नरवीर तानाजी मालुसरे रस्त्याला (सिंहगड रोड) पर्याय म्हणून विकसित केल्या जाणाऱ्या कालव्यालगताच रस्ता, कचरा, पथदिवे, बाह्यवळण मार्गावर आंबेगाव परिसरातील वाढलेली अतिक्रमणे, या परिसरात होणारी वाहतूक कोंडी अशा अनेक गोष्टींकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. आगामी काळात पालिकेच्या सर्व विभागांमार्फत संबंधित समस्यांवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन निंबाळकर यांनी सुळे यांना दिले.