प्रकाश जावडेकरांच्या मंत्रीपदामुळे पुणेकर खूश!

84

पुणे : प्रकाश जावडेकर यांच्यामुळे केंद्रीय मंत्रीमंडळात पुणे शहराला सलग दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. जावडेकर यांचे महाविद्यालयीन जीवन तसेच राजकीय सुरूवात पुण्यातूनच झाली.

श्रीपती शास्त्री व दामुअण्णा दाते यांनी जावडेकर यांची राजकीय जडणघडण केली. अभाविपमध्ये त्यांना यशवंतराव केळकर व बाळ आपटे यांनी मार्गदर्शन केले. पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे ते सदस्य होते. त्याचवेळी त्यांचा गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर परिचय झाला. आणीबाणीमध्ये १३ महिन्यांचा कारावास त्यांना झाला. नंतर त्यांनी १९८१ मध्ये महाराष्ट्र बँकेचा राजीनामा देऊन पूर्णवेळ राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.

राज्यात पदवीधर मतदारसंघातून ते विधानपरिषदेवर निवडून गेले. राज्यात प्रवक्ते तसेच नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशी पदे जावडेकर यांनी भूषवली. प्रमोद महाजनांच्या आशिर्वादाने त्यांना केंद्रीय स्तरावर घेण्यात आले. तिथेही त्यांच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली. २०१४ मध्ये मोदीप्रणित मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला. पर्यावरणमंत्री असताना केलेल्या कामामुळे त्यांना मनुष्यबळ या महत्वाच्या पदावर बढती देण्यात आली. आता सलग दुसऱ्यांदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले.

जावडेकर गेली अनेक वर्षे दिल्लीतच कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंबही दिल्लीतच आहे. त्यामुळे त्यांचे फारसे कार्यकर्ते पुण्यात नाहीत. त्यातच मागील वेळेस ते मध्यप्रदेश राज्यातून राज्यसभेवर निवडून गेले. त्यामुळे त्यांचा पुण्यातील संपर्क बराच कमी झाला.