औरंगाबादेत विवाहितेला जिवंत जाळले; कारण काय तर, मुलगी झाली…

55

औरंगाबाद – मुलगी झाल्याचा राग मनात धरून पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात घडली आहे. जळालेल्या विवाहितेचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रिया धम्मपाल शेजवळ (वय २५, रा. अंधारी, जि. औरंगाबाद) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

औरंगाबाद शहरातील मयूर पार्क येथील रहिवासी माधवराव बनकर यांची मुलगी प्रिया हिचा सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील धम्मपाल शेजवळ याच्याशी २ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तिला वर्षभरापूर्वी मुलगी झाल्याने सासरच्या मंडळींकडून गेल्या १३ महिन्यांपासून छळ सुरू होता. मुलगी झाल्यामुळे छळ होत असल्याने ग्रामीण पोलिसांकडे महिला तक्रार निवारण कक्षाकडून समुपदेशन करण्यात आले होते. त्यानंतर महिन्यापासून ती पुन्हा अंधारी येथे सासरी नांदायला गेली होती. दरम्यान १८ मे रोजी सकाळी ११ वाजता पती धम्मपाल शेजवळ, सासू अरुणा उत्तम शेजवळ, मामे सासरा अॅड. विजय वानखेडे यांनी संगनमताने अंगावर ज्वलनशील द्रव्य टाकून तिला पेटवून दिले. शेजारच्यांनी आग विझवली असता पती धमपाल याने प्रियाला घाटी रुग्णालयात दाखल करून पळ काढला. मृत प्रियाला १४ महिन्यांची मुलगी आहे. प्रिया हिचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.