पुण्याच्या सारसबागेत नेमकं चाललंय तरी काय ?

174

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असलेल्या सारसबागेत नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. सारसबागेत ठिकठिकाणी दारुच्या बाटल्या लाेकमत पाहणीमध्ये आढळून आल्या असून त्यामुळे बागेत मद्यपींचा अड्डा भरताे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. बागेच्या झाडीमध्ये तसेच हिरवळीवर या बाटल्या आढळून आल्या आहेत.

सारसबाग ही पुण्यातील प्रसिद्ध बाग आहे. राेज येथे हजाराे लाेक येत असतात. या बागेत पेशवेकालीन तळ्यातला गणपती असल्याने या ठिकाणाला अध्यात्मिक महत्त्व देखील आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात ही बाग आहे. तसेच पुणेकरांच्या मनात या बागेविषयी विशेष स्थान आहे. दिवसभर ही भाग नागरिकांसाठी सुरु असते. आज लाेकमतने बागेची पाहणी केली असता बागेत ठिकठिकाणी दारुच्या बाटल्या पडल्या असल्याचे निदर्शनास आले. बागेच्या हिरवळीवर तसेच बाजूने असणाऱ्या झाडींमध्ये या बाटल्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे बागेत नेमकं चालतं तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बागेमध्ये माेठ्याप्रमाणावर लाॅन आहे. दिवसभर पर्यटक, पुणेकर या बागेत येत असतात. त्याचबराेबर बागेच्या परिसरात अनेक भेळ व इतर खाद्यपदार्थांचे स्टाॅल्स आहेत. अनेक पर्यटक तसेच नागरिकांकडून भेळीचे, खाद्यपदार्थांचे कागद हे लाॅनवरच टाकण्यात येत असल्याने या लाॅनला कचऱ्याचे स्वरुप आल्याचे लाेकमत पाहणीमध्ये दिसून आले. त्याचबराेबर बागेच्या बाजूने लावण्यात आलेल्या झुडपांमध्ये देखील माेठ्याप्रमाणावर कचरा फेकण्यात आला आहे. त्यामुळे बागेचे साैंदर्य विद्रुप झाले आहे. बागेत लावण्यात आलेल्या कचराकुंड्या देखील तुडुंब भरुन वाहत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासन याकडे लक्ष देणार का असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.