सलमानने काढली मराठमोळ्या ‘लक्ष्या’ची आठवण; हे आहे कारण

114

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि मराठमोळे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. ‘मैने प्यार किया’, ‘साजन’, आणि ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटांत ही जोडी एकत्र झळकली. अशात सलमानने लक्ष्मीकांत यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

लक्ष्मीकांत यांनी १६ डिसेंबर २००४ ला जगाचा निरोप घेतला. मात्र, त्यांच्या अभिनयामुळे ते आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. आता अभिनेता सलमान खाननेही एका डान्स शोच्या चित्रीकरणादरम्यान लक्ष्मीकांत यांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. मैंने प्यार किया चित्रपटाच्या यशात लक्ष्मीकांत यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं सलमानने म्हटलं आहे.

या डान्स शोमध्ये एका स्पर्धकाने ‘साजन चित्रपटातील ‘तुमसे मिलने की तमन्ना है’ गाणयावर डान्स केला होता. या गाण्यात सलमानसोबत लक्ष्मीकांतदेखील झळकले होते. त्यामुळे सलमान त्यांच्या आठवणीत भावूक झाला. या गाण्यासोबत खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत. यात माझ्यासोबत माझा जिवलग मित्र लक्ष्मीकांत बेर्डे झळकले होते, असे सलमानने यावेळी म्हटले. ते आज आपल्यात नसले तरीही हे गाणं मला कायम त्यांची आठवण करून देईल, असं सलमान पुढे म्हणाला.