“अध्यक्षजी जवाब देंगे” म्हणत मोदींचा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास नकार

154

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपताना दिल्लीत आज भाजपची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. मात्र यावेळी मोदींना विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देण्याचं त्यांनी टाळल्याचं पहायला मिळालं.

भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकार परिषदेत हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी भाजप सरकारकडून करण्यात आलेली काम, लोकसभा निवडणुक आणि प्रचार याबाबत माहितीही दिली. मात्र त्यानंतर पत्रकारांकडुन विचारण्यात आलेल्या प्रश्नांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं. यावेळी एका पत्रकाराने मोदींनी प्रश्न विचारला असता “अध्यक्षजी जवाब देंगे” असं म्हणत मोदींनी उत्तर देण्याचं टाळलं.

याचवेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची देखील पत्रकार परिषद सुरु होती. “पंतप्रधान मोदींची पत्रकार परिषद ही अभूतपूर्व घटना आहे”, या शब्दात राहुल गांधींनी मोदींच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच “मोदी जिथे पत्रकार परिषद घेत आहेत, त्या खोलीचा दरवाजा बंद करण्यात आला आहे”, असा आरोपही केला आहे.