मोठी बातमी : काँग्रेसच्या उद्याच्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्‍यता

135

मुंबई (प्रहार प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अंतर्गत छुप्या आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. जिल्ह्यातील काँग्रेसच्याच जबाबदार माणसानी पक्ष विरोधी काम केल्याचे आरोप झाले.पक्षाच्या तळमळीच्या कार्यकर्त्यांना जिल्हा पदाधिकाऱ्यांकडुन कोणतेच सहकार्य न मिळाल्याने तशा तक्रारीही वरिष्ठांकडे करण्यात आल्या.

दरम्यान, मुंबईतील राष्ट्रीय काँग्रेसच्या टिळक भवनात १८ मे रोजी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. पक्षविरोधी कारवायांवरून या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रीय काँग्रेसचे कोकणचे निरीक्षक बी. एम. संदीप यांनी काँग्रेसच्या मुंबईतील टिळक भवन कार्यालयात या बैठकीचे आयोजन केले आहे. १८ मे रोजी ही बैठक होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी,तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीतील पक्षविरोधी कारवायानंतर आयोजित केलेली ही बैठक महत्वाची मानली जाते. लोकसभेसाठी मतदान झाल्यानंतर त्वरित काहींनी पक्षविरोधी काम केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या होत्या. यामुळे टिळक भवनात होणाऱ्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

पक्ष विरोधी कारवाईचे उत्तर द्यावे लागणार या भितीने जिल्हयातील काही पदाधिकारी या बैठकीला दांडी मारणार असल्याचेही बोलले जाते.