पुणे पोलिसांचा डिजिटल चार्जशीटवर भर

८९ खटल्यातील दोषारोपपत्र डिजिटल स्वरुपात दाखल 

पोलीस ठाण्यात त्याची लायब्ररी केली तर ते ठेवणे सोयीचे

प्रतिसाद लक्षात घेऊन लवकरच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार


पुणे : वर्षानुवर्षे रेंगाळणारे खटले आणि त्यातील शेकडो पानांचा गठ्ठा सांभाळत बसण्याचा त्रास वाचविण्यासाठी पुणे पोलीस यापुढे न्यायालयात डिजिटल चार्जशिट दाखल करण्यावर भर देणार आहे़. सध्या पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १मधील दोषारोपपत्र प्रायोगिक तत्वावर डिजिटल स्वरुपात न्यायालयात दाखल करण्यास सुरुवात केली आहे़. आतापर्यंत एकूण ८९ दोषारोपपत्र डिजिटल स्वरुपात न्यायालयात सादर करण्यात आली आहेत़. लवकरच याचा अवलंब शहरातील सर्व पोलीस ठाण्यात करण्यात येणार आहे़.

गुन्ह्यातील सर्व जाबजबाब, साक्षीपुरावे हे सर्व एकत्रित करुन ते न्यायालयात सादर केले जाते़. अनेक गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र हे शेकडो तसेच काही गुन्ह्यांमध्ये तर ते हजारो पानांचे असते. ते जपून ठेवणे़ त्यातील महत्वाच्या गोष्टी जेव्हा लागतील, तेव्हा संबंधित वकील, तपास अधिकारी यांना उपलब्ध करुन देणे अनेकादा जिकीरीचे जाते़. बऱ्याचवेळा या दोषारोपत्रातील नेमकी कोणती माहिती सरकारी वकील, तपास अधिकाऱ्यांना हवी आहे, हे संबंधित रेकॉर्ड ठेवणाऱ्यांना माहिती होत नाही़. त्याचा शोधाशोध करण्यात वेळा जातो़. त्यावर पर्याय म्हणून ही सर्व कागदपत्रे सीडीच्या स्वरुपात साठवून ठेवून ती आवश्यक तेव्हा वापरली जाते़.

खटल्यातील सर्व पाने, पुरावे स्कॅन केले जाते व ते एका सिडीमध्ये साठविले जाते़. ही सिडी न्यायालयात सादर केली जाते़. तसेच मुख्य कागदपत्रे न्यायालयात दिली जातात़. खटल्यात जेवढे आरोपी आहेत, त्या सर्वांना दोषारोपपत्र सिडीच्या स्वरुपात दिले जाते़.

याचा फायदा तपास अधिकारी, सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांनाही होऊ लागला आहे़. या डिजिटल चार्जशिटला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन लवकरच ती शहरातील सर्व पोलीस ठाण्यात राबविण्यात येणार आहे़.

Pune Prahar

पुणे प्रहार

error: Content is protected !!