राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षांचा धमकीवजा इशारा

121

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधात सोशल मीडियावर बेताल वक्तव्य केले तर कायदेशीर गुन्हा दाखल करूच पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरपोच सेवा देऊन विचारपूस करतील असा धमकीवजा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की, खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह कॉमेंट करणाऱ्या कोल्हापूर  जिल्ह्यातील चावरे गावच्या किशोरवयीन तरुणास राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री चोप देत कोल्हापूरी खाक्या दाखविला.ईव्हीएम नको, अशी आमची भूमिका आहे, या सुळे  यांच्या विधानाविषयीच्या बातमीची पोस्ट एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक अकाउंटवर होती. या बातमीच्या कॉमेंट बॉक्समध्ये या तरुणाने सुप्रिया सुळेंविषयी अपशब्द वापरले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलने या तरुणाचा शोध घेतला असता तो कोल्हापूर जिल्ह्यातील चावरे येथील असल्याचे निष्पन्न झाले. कार्यकर्त्यांनी चावरे गावी जाउन त्याचा शोध घेत त्याला चोप दिला आणि जाहीर माफी मागायला भाग पाडले.

दरम्यान चाकणकर यांनी या तरुणाची तक्रार पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. मात्र त्यासोबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपला व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यात त्यांनी ‘इथुन पुढे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे व  पक्षाच्या कोणत्याही नेत्यांबद्दल अश्लील व बेताल वक्तव्य कराल तर कायदेशीर गुन्हा दाखल करूच पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाहुणचारासाठी घरपोच सेवा देऊन विचारपूस देखील करतील याचीही दखल घ्यावी’. अशा भाषेत त्यांनी इशारा दिला आहे. त्यात त्यांनी माहितीसाठी एक झलक असेही म्हटले आहे.

सोशल मीडियावर कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर व्यक्तिगत आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे अत्यंत चुकीचे आहे. मात्र असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला कायदेशीर मार्गाने धडा शिकवण्याच्या पर्यायावर न थांबता थेट संबंधितांच्या घरी जाऊन ‘विशेष’ शैलीत संवाद साधण्याकडे राजकीय कार्यकर्त्यांचा कल वाढला आहे.