बुद्ध जयंतीनिमित्त धम्मपहाट व सांस्कृतिक महोत्सव

पुणे : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने धम्मपहाट व तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर व दीपक म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परशुराम वाडेकर म्हणाले, “शनिवार, दि. १८ मे २०१९ रोजी पहाटे ५.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पुणे स्टेशन येथे स्वरबासरीवर आधारित धम्मपहाट कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचे गायन व जगप्रसिद्ध बासरीवादक रोनू मुजुमदार यांचे बासरीवादन ऐकण्याची संधी मिळणार आहे. धम्मपहाट महोत्सव गेल्या १७ वर्षांपासून, तर सांस्कृतिक महोत्सव २० वर्षांपासून अविरत सुरु आहे.”

“रविवार, दि. १९ मे २०१९ रोजी पंजाब येथील प्रसिद्ध गायिका गीन्नी माही हिच्या बुद्ध, शिवराय, फुले, आंबेडकर यांच्यावर आधारित हिंदी-पंजाबी गीतांचा शाहिरी जलसा पुण्यात पहिल्यांदाच होत आहे. सोमवार दि. २० मे २०१९ रोजी लोकगीतांचा बादशाह असलेल्या आनंद शिंदे यांचा शिंदेशाही बाणा हा विशेष कार्यक्रम होणार असून, त्यामध्ये भीमगीतांसह हिंदी-मराठी व पोवाडा, कव्वालीसह लोकगीतांची मेजवानी मिळणार आहे. तर महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी मंगळवार, दि. २१ मे २०१९ रोजी नागपूर येथील जाधव सिस्टर्स यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार असून, त्यामध्ये विनया, विजया जाधव यांचा भीमगीतांचा अनोखा नजराणा ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. दि. १९, २० व २१ मे २०१९ रोजीची तीनही कार्यक्रम रोज सायंकाळी ६.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, भाऊ पाटील रोड, बोपोडी, पुणे येथे होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहेत,” असेही वाडेकर यांनी नमूद केले.

Pune Prahar

पुणे प्रहार

error: Content is protected !!