सृजन फौंडेशन व एमपीएससी स्टुडंट्स राईट्सतर्फे स्पर्धा परिक्षा राज्यस्तरीय महोत्सवाचे आयोजन

166

पुणे : “महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, दरवर्षी त्यामध्ये लाक्षणिक वाढ होत आहे. परंतु, या परिक्षेची तयारी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय, स्पर्धा मोठी असल्याने यश-अपयशालाही सामोरे जावे लागते. अशावेळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या तरुणाईला योग्य मार्गदर्शन मिळणे अतिशय आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनाही या स्पर्धा परीक्षेचे वास्तव उलगडून दाखविण्यासाठी स्पर्धा परिक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वास्तव, भवितव्य व दिशा या संकल्पनेवर आधारित हा स्पर्धा परिक्षा महोत्सव १८ ते २० जून २०१९ या तीन दिवशी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडामंच येथे होत आहे,” अशी माहिती सृजन फौंडेशनचे अध्यक्ष व बारामती अ‍ॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार व एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे (एमएसआर) महेश बडे व किरण निंभोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी साई डहाळे, श्रीकांत कदम, प्रतीक धुमाळ, विजय मते आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठीच्या ‘कॉम्पिटेटिव्ह ऍस्पिरेन्ट्स नेव्हीगेटर’ या ऍपचे व संकेतस्थळाचेही यावेळी अनावरण करण्यात आले.

रोहित पवार म्हणाले, “आजच्या तरुणाईला प्रशासनात काम करण्याची आवड आहे. प्रशासनात जाऊन जनसेवा करण्याची इच्छा मनाशी बाळगून तरुण स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत. या तरुणाईला स्पर्धा परीक्षेविषयी योग्य मार्गदर्शन मिळणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे अशा स्पर्धा परीक्षांविषयी माहिती उपलब्ध करुन विद्यार्थ्यांना ध्येय गाठण्यात मार्गदर्शन करण्यासाठी स्पर्धा परीक्षा महोत्सव 2019 (वास्तव, भवितव्य व दिशा) पर्याय आहे. तीन दिवसांच्या या महोत्सावात प्रत्येक दिवशी चार सत्र असणार आहेत. महोत्सवात लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष, प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, शैक्षणिक, उद्योग, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तरुणांनी सुरु केलेल्या अशा उपक्रमाला बळ देण्यासाठी सृजन फौंडेशन नेहमीच पुढाकार घेत असते. पाच-सात वर्षे सतत अभ्यास करुनही हाती यश येत नसल्याने आणि वय वाढत असल्याने नैराश्य येते. त्यातून वाढणारी व्यसनाधीनता, खचलेला आत्मविश्वास हा त्या उमेदवारांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी, राज्याच्या हितासाठी घातक आहे. मोठ्या संख्येने तरुणवर्ग स्पर्धा परीक्षेच्या मृगजळात अडकलेला आहे. अशावेळी त्याला वास्तवाची जाण करुन देत योग्य दिशा देऊन त्याचे भवितव्य सुकर करण्यासाठी हा महोत्सव निश्चित उपयुक्त ठरणार आहे. ज्यांना स्पर्धा परीक्षेत अपयश आले, त्यांना व्यवसाय मार्गदर्शन केले जाणार आहे. हा महोत्सव सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आयोजित करण्यात आला आहे. यातून उभ्या राहणार्‍या निधीचा उपयोग आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी केला जाणार आहे.”

पत्रकार परिषदेत बोलताना डावीकडून विजय मते, महेश बडे, रोहित पवार, किरण निंभोरे, साईनाथ डहाळे.

महेश बडे म्हणाले, “सृजन फौंडेशनच्या रोहितदादा पवार यांच्या पुढाकारातून आणि ‘एमएसआर’च्या माध्यमातून स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी या भव्य स्पर्धा परीक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यातील लाखोंच्या संख्येने असलेल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या समस्या लोकसेवा आयोग व राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी मदतकेंद्रही उभारण्यात येणार आहे. या कार्यक्रमात क्लासेस, ऑनलाईन अभ्यास पोर्टल्स, व्यवसाय मार्गदर्शन, प्रकाशने असे विविध स्टॉल्स असणार आहेत. नैराश्यग्रस्त, आत्मविश्वासाने खचलेल्या उमेदवारांसाठी तज्ज्ञांकडून समुपदेशन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी स्पर्धा परीक्षेच्या अ‍ॅपचे अनावरण होणार आहे. त्यावर 20 प्रश्नांची परीक्षा घेऊन प्रथम, द्वितीय व तृतीय येणार्‍या विद्यार्थ्यांना मोफत क्लासला बसण्याची संधी मिळणार आहे. राज्यभरात एकाच दिवशी ही परिक्षा घेतली जाणार आहे. हा महोत्सव विद्यार्थी व पालकांसाठी दिशादर्शक असणार आहे. राज्यातील सरकारी नोकरीबाबतची सद्यस्थिती दरवर्षी विविध पदांसाठी सरासरी आठ-दहा हजार पदांची आहे. मात्र, यासाठी राज्यातून 12-13 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी तयारी करत असतात. 10वी, 12वीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी केली जात आहे. नोकरी करणारा वर्ग, निवृत्त लष्करी जवान, गृहिणी, सरकारी सेवेतील व्यक्ती स्पर्धा परीक्षेसाठी झगडत आहे. पण यातील वास्तव खूप जणांना माहीत नाही. दरवर्षी किती जागा निघतात, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, मार्गदर्शन, या सर्व विषयांची जाण नसते. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी महेश बडे (९१५८२७८४८४) व किरण निंभोरे (८४८४०८६०६१) या क्रमांकावर किंवा www.spardhaparikshamahotsav.com या संकेतस्थळावर संपर्क करावा.”

सृजन फौंडेशन व ‘एमएसआर’ची उद्दिष्ट्ये :

– दुष्काळग्रस्त भागातील उमेदवांसाठी अभ्यासिका

– जिल्हा/तालुक्याच्या ठिकाणी वाचनालय

– पोटभर जेवण (1 वेळेस चहा आणि नाश्ता व 2 वेळा जेवण)

– प्रत्येक महिन्यात प्रशासकीय, सामाजिक व राजकीय मान्यवरांचे व्याख्याने

– अंध व अपंगांसाठी विशेष सवलती, व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम

– प्रत्येक महिन्यात मानसोपचारतज्ज्ञांची व्याख्याने व समुपदेशन

सृजन फौंडेशनविषयी : स्पर्धा परीक्षा देणार्‍यांची वाढती संख्या, राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनासाठी सृजन फौंडेशन कार्यरत आहे. सृजन फौंडेशनच्या वतीने समाजातील विविध स्तरांवर सामाजिक कार्य केले जाते. स्पर्धा परीक्षा देणार्‍या उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून सृजन फौंडेशन प्रशासनातील उच्च दर्जाच्या पदावरील व्यक्ती, उद्योग क्षेत्रातील मान्यवर यांना बोलावून उमेदवारांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करत असते. त्यासोबत आज महाराष्ट्रातून पुण्यात येणार्‍या उमेदवारांसाठी दुष्काळाच्या परिस्थितीत एक माणुसकीचा हात म्हणून या तरुणांसाठी मेसची व्यवस्था केली जात आहे.

एमपीएससी स्टुडंट्स राईट्सबद्दल‘एमएसआर’ संस्था गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेच्या तरुणांच्या हक्कासाठी नि:स्वार्थ भावनेने कार्यरत आहे. राज्य शासनाच्या विविध भागातील रिक्त असणार्‍या जागा भरण्यात याव्यात व वयाची अट वाढवण्यात यावी यातून झालेला आहे. संघटनेने आजवर मोर्चे, उपोषणे, पदयात्रा काढून स्पर्धा परीक्षा देणार्‍या उमेदवारांचा आवाज सभागृहात पोहोचवला. परीक्षेतील दिरंगाई, निकाल, आरक्षण पद्धती, रिक्त जागा याविरुद्ध लढा देत सरकारला व आयोगाला पारदर्शकतेसाठी बायोमॅट्रिक, सीसीटीव्हीसारखी यंत्रणा, मोबाईल जॅमर अशा नवीन सूचना करून त्या अंमलात आणण्यास सांगितले.