मोई येथे दगडखाणीतील पाण्यात युवक बुडाला : शोधकार्य सुरु

141

चाकण : मोई ( ता. खेड ) येथील दगड खाणीतील पाण्यात आपल्या मित्रांबरोबर पोहण्यासाठी गेलेला अकरावीत शिक्षण घेणारा महाविद्यालयीन युवक बुडाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी ( दि. ३ मे ) सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आला आहे. पिंपरी – चिंचवड महापालिकेतील अग्निशमन दल व मोई गावातील पोहणा-या स्थानिक तरुणांनी रात्री उशिरा पर्यंत सबंधित युवकाचा शोध घेण्याचे कार्य सुरु ठेवले आहे.

गौतम सुधीर निटूर ( वय – १७ वर्षे, रा. मोशी, ता. हवेली,) असे पाण्यात बुडालेल्या युवकाचे नाव आहे. खेड तालुक्यातील मोई येथील उद्योगनगर मध्ये दगडखाण असून, या दगड खाणीतील पाण्यात शुक्रवारी ( दि. ३ मे ) सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान स्पिन सिटी मोशी येथील एकुण पाच जण युवक पोहण्यासाठी आले होते. त्यावेळी गौतम हा पाण्यात पोहताना दमछाक होवून बुडाला. त्याने नुकतीच अकरावीची परीक्षा देवून तो बारावी मध्ये गेला होता. तो बुडाल्याचे समजताच पिंपरी – चिंचवड महापालिकेतील अग्निशमन दल व स्थानिक युवकांनी पाण्यात पोहून गौतम याचा शोध घेण्याचे काम सुरु केले आहे. रात्री उशिरा पर्यंत त्याचा शोध लागला नसल्याचे शोध पथकाने सांगितले.