चुलीचा भडका उडाल्याने सहा झोपड्या जळून खाक

157

चाकण येथील कातकरी वस्तीवरील प्रकार : एकजण जखमी, लाखोंचे नुकसान

चाकण : मासेमारीसाठी गेलेल्या कातक-यांच्या झोपडीतील चुलीचा अचानक भडका उडाल्याने शुक्रवारी ( दि. ३ मे ) सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान झालेल्या विचित्र घटनेत कातक-यांच्या एकुण सहा झोपड्या जळून खाक झाल्या. या दुर्घटनेत एकजण जखमी झाला असून, यावेळी  गृहपयोगी साहित्यांसह महत्वाची कागदपत्रे, धान्य असे जळून चार लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. स्थानिक नागरिक व राजगुरुनगर येथील अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी पाण्याचा प्रचंड मारा करून काही तासातच ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. येथील चाकण नगरपरिषदेचे अधिकारी, महसूल शाखेचे अधिकारी व पोलीस प्रशासनाने घटना स्थळी जावून घटना स्थळाचा पंचनामा केला आहे.

मारुती दामु पवार, संगीता राजेंद बोंबले, बाबुराव जयवंत निंबाळकर, धोंडीबा धनाजी जाधव, शिवाजी तुकाराम मुकणे व दुर्गा वामन देवकर या कातकरी मासेमारी करून पोटाची खळगी भरणाऱ्या गरिबांच्या झोपड्या जळाल्या आहेत. याबाबतची माहिती अशी की, वरील लोकांचा मासेमारी करणे हा मुख्य व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे ते सर्वजण शुक्रवारी ( दि. ३ मे ) सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान काळूस येथे मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांच्या झोपडीतील चुलीचा अचानक भडका उडाल्याने आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धरण केल्याने परिसरात आगीचे लोट दिसू लागले. या आगीत गृहपयोगी साहित्य, धान्य कागदपत्रे, जळून खाक झाली आहेत. या घटनेत एकजण जखमी झाला असून, लाखोंचे नुकसान झाले आहे.