चाकणला सिनेअभिनेत्रींनी गाजवली सांकला व्याख्यानमाला

21

पाच दिवसांच्या कार्यक्रमाची उत्साहात सांगता

चाकण : चाकण रोटरी क्लबच्या वतीने चाकण येथे सलग पाच दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कै. शेठ धनराजजी सांकला स्मृती व्याख्यानमालेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सिनेअभिनेत्रींनी चाकणची सांकला व्याख्यानमाला यंदा चांगलीच गाजविली. डॉ. प्रज्ञा भवारी हया स्वत: चाकण रोटरी क्लबच्या महिला अध्यक्षा असल्याने त्यांनी व्याख्यानमालेच्या माध्यमातून महिलांना व सिनेअभिनेत्रींना एक खुले व्यासपीठ निर्माण करून दिल्याने या वर्षीची व्याख्यानमाला चांगलीच गाजली असल्याचे संकेत मिळाले आहेत.

येथील पोलीस ठाण्यासमोरील रोटरी कम्युनिटी सेंटर मध्ये चाकण रोटरी क्लबच्या वतीने सलग पाच दिवसांच्या कालावधीत कै. शेठ धनराजजी सांकला व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. गेल्या तीस वर्षापासून ही व्याख्यानमाला अखंडितपणे सुरु असून, यंदा या व्याख्यानमालेचे एकतिसावे वर्षे होते. चाकण शिक्षण मंडळाचे सचिव व चाकण रोटरी क्लबचे संस्थापक – माजी अध्यक्ष मोतीलाल सांकला यांचे वडील कै. शेठ धनराजजी सांकला यांनी त्यांच्या हयातीत अनेक लोकोपयोगी कामे करून आपल्या कार्यकर्तुत्वाने समाजात वेगळा ठसा उमटविला होता. त्यामुळे त्यांच्या कष्टाचे चिज व्हावे, त्यांच्या आठवणी चिरंतन काळ टिकून राहाव्यात, आणि त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा, या हेतूने गेल्या तीस वर्षापासून चाकण रोटरी क्लबच्या माध्यमातून या व्याख्यानमालेचे आयोजन केले जात आहे. 

रोटरीच्या सन २०२० – २१ या वर्षीच्या नियोजित प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. मिसेस इंडिया डॉ. प्रेरणा बेरी कालेकर यांनी यावेळी ” आयुर्वेद व महिलांचे आरोग्य ” या विषयवार व्याख्यान मालेचे पाहिले पुष्प गुंफले. याप्रसंगी आदर्श शिक्षिका नीलिमा मांडेकर यांना रोटरी गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध व्याख्यात्या निलांबरी जोशी यांनी ” सोशल मिडियाचे दुष्परिणाम ” या विषयवार दुसरे, तर प्रसिद्ध सिनेअभिनेत्री समीरा गुर्जर यांनी ” महिलांचे लेखन साहित्य ” या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. भारतीय सेनेच्या नेत्या स्मिता गायकवाड यांनी ” युद्धस्य कथा व माओवाद ” या विषयवार चौथे पुष्प गुंफले.    प्रसिद्ध सिनेअभिनेत्री नम्रता जाधव यांनी ” मराठी सिनेसृष्टीतील अनुभव ” या विषयावर मार्गदर्शन करून अखेरचे पाचवे पुष्प गुंफले. यावेळी मोतीलाल सांकला, संदीप बागडे, दीपक करपे, भाग्यश्री करपे, भगवान घोडेकर, ज्ञानेश्वर सातव, सुवर्णा गोरे, डॉ. अविनाश अरगडे, डॉ. विजय भवारी, भगवान माळी, नितीन पाटील, मोहन परदेशी, सुहास गोरे, सुनील शहा, ध्रुवशेठ कानपिळे आदि उपस्थित होते.

चाकण रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. प्रज्ञा भवारी व सचिव कीर्तीकुमार शहा यांनी स्वागत केले. व्याख्यानमाला समितीचे चेअरमन डॉ. रावसाहेब आवटी यांनी प्रास्ताविक केले. अतुल वाव्हळ यांनी सूत्रसंचालन केले. मनाली सांकला यांनी परिचय करून सर्वांचे आभार मानले.