सूर्यदत्ता ग्रुप आणि आयआयएमबीएक्स यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार

181

‘आयआयएमबीएक्स बी-स्कूल पार्टनरशिप प्रोग्राम’मधून विद्यार्थी-प्राध्यापकांना मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण व प्रशिक्षण

पुणे : “विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्याधारित आणि प्रत्यक्ष अनुभवाचे शिक्षण मिळण्यासाठी ‘आयआयएमबीएक्स बी-स्कूल पार्टनरशिप प्रोग्राम’ उपयुक्त ठरणार आहे. आजच्या डिजिटल, इंडस्ट्री ४.० च्या काळात विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना नाविन्यपूर्ण शिक्षण घेणे क्रमप्राप्त आहे. आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी हे एक महत्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांसाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे,” असे मत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) बंगलोरच्या डिजिटल लर्निंग सेंटरचे प्रमुख प्रा. डॉ. पी. डी. जोस यांनी व्यक्त केले.

पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये आयआयएम बंगलोरच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या ‘आयआयएमबीएक्स बी-स्कूल पार्टनरशिप प्रोग्राम’चे उदघाट्न डॉ. जोस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्ट्रैटर्जिक फोरसाईट ग्रुपचे वरिष्ठ सल्लागार सचिन ईटकर, सूर्यदत्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, टाटा (टॅको) ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद गोयल, संचालक शैलेंद्र कासंडे, संचालिका (जनसंपर्क) कॅप्टन शालिनी नायर, कार्यकारी संचालक अक्षित कुशल, सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते. यावेळी सूर्यदत्ता आणि आयआयएमबीएक्स बंगलोर यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार झाला. या उपक्रमांतर्गत एमबीए व पीजीडीएम विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि कौशल्य वाढविण्यासाठी, तसेच जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘आयआयएमबीएक्स बंगलोर’तर्फे प्रमाणपत्र मिळणार आहेत.

दीपप्रज्वलन प्रसंगी डावीकडून सिद्धांत चोरडिया, कॅप्टन शालिनी नायर, सचिन इटकर, अरविंद गोयल, डॉ. पी. डी. जोस, डॉ. संजय चोरडिया, डॉ. शैलेंद्र कासंडे, सुषमा चोरडिया.

प्रा. डॉ. पी. डी. जोस म्हणाले, “या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी-शिक्षकांना जागतिक दर्जाचे व आधुनिक शैक्षणिक आणि व्यावसायिक कौशल्य विकसित होतील. आयआयएम ही आशियातील अग्रगण्य व्यवस्थापन संस्था आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात आयआयएम बंगलोरला प्रथम क्रमांकाचा दर्जा प्राप्त झाला आहे. पदवी, पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमाबरोबरच पोस्ट डॉक्टरल शिक्षण येथे उपलब्ध आहे. आयआयएमबीमध्ये नेतृत्व आणि उद्योजक घडण्यासाठी आवश्यक कौशल्य देण्यावर भर असतो. आजच्या काळात तीच यशाची गुरुकिल्ली मनाली जाते. येथे मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स (एमओयूसीएस) कार्यक्रम आहे. ज्यामुळे व्यवस्थापनाचे विद्यार्थी अधिक चांगले घडतात. आर्थिक किंवा प्रादेशिक अडथळ्यांना न जुमानता विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी डिजिटल शिक्षण उपक्रम सुरु केला आहे. सूर्यदत्ताशी झालेल्या या करारामुळे पुण्यातील विद्यार्थी-प्राध्यापकांना त्याचा लाभ होईल.”

डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “भारतात मॅनेजमेंटचे शिक्षण देणाऱ्या सुमारे चार हजार पेक्षा अधिक संस्था कार्यरत आहेत. जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट नेहमीच अग्रभागी राहिलेली आहे. अशा जागतिक दर्जाच्या संस्थांबरोबर सूर्यदत्ता ग्रुपचा सामंजस्य करार होणे हा संस्थेचा बहुमान आहे. यामुळे विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजिकल डेव्हलपमेंट, आधुनिक शिक्षण मुलांना मिळेल. त्यातूनच उद्योगाला आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण होईल. शिक्षकांनाही बेंगलोरमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवणार आहोत. शिक्षकांनाही विविध पद्धतीचे प्रात्यक्षिक अनुभव असणे गरजेचे आहे. तसे झाले तर चांगल्या रीतीने ते विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवू शकतात.”

आयआयएमबीएक्स बी-स्कूल पार्टनरशिप प्रोग्राम’चे उदघाट्न करताना डॉ. पी. डी. जोस, डॉ. संजय चोरडिया, सचिन इटकर, अरविंद गोयल, डॉ. शैलेंद्र कासंडे, सुषमा चोरडिया, कॅप्टन शालिनी नायर व इतर.

सचिन इटकर म्हणाले, “गेल्या काही वर्षात सूर्यदत्ता ग्रुप सातत्याने दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जागतिक दर्जाच्या विविध संस्थांशी भागीदारी करीत कौशल्याधारित, नाविन्यपूर्ण आणि संशोधनकेंद्री शिक्षण दिले जात आहे. संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी केले जात असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.”

अरविंद गोयल म्हणाले, “इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशीच स्पर्धा करून आपल्यातील क्षमता विकसित करत राहिले पाहिजे. त्यातून आपला आत्मविश्वास वाढतो. कोणत्याही टप्प्यावर आलेल्या अपयशाने खचून न जाता उर्वरित काळात मिळणाऱ्या संधींचा लाभ कसा उठवता येईल, याचा विचार करावा.” डॉ. शैलेंद्र कासंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कॅप्टन शालिनी नायर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रतीक्षा वाबळे यांनी आभार मानले.