बारामतीत वाढलेल्या साडेतीन टक्के मतांचा फायदा कोणाला?

12

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात यंदाच्या वेळी २०१४ च्या तुलनेत साडेतीन टक्यांनी मतांचा टक्का वाढला आहे. या वाढलेल्या मतांचा फायदा कोणाला होणार? हाच प्रश्न आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात वाढलेली टक्केवारी आणि त्या तुलनेत खडकवासल्यात घटलेला टक्का यामुळे निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल यांनी आव्हान दिले आहे. गेल्या वर्षी भाजपा पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची सुळे यांच्याशी लढत झाली होती. सुळे यांचा ६९ हजार मतांनी विजय झाला होता. मात्र, जानकर यांनी खडकवासल्यातून २८,१२७, दौंडमधून २५,५४८ आणि पुरंदरमधून ५,६६६ मतांची आघाडी घेतली होती. सुळे यांना बारामतीतून ९०,६२८,, इंदापूरमधून २१,६९३ आणि भोरमधून १६,८८५ मतांची आघाडी मिळाली होती. जानकर यांनी कमळ हे चिन्ह घेतले असते तर त्यांचे मताधिक्य आणखी वाढले असते अशी चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत खडकवासला आणि बारामतीतील मतदान महत्वाचे ठरणार आहे. खडकवासल्यातील मतदानाची टक्केवारी घटलेली दिसत असली तरी मतदारसंख्या वाढली आहे. गेल्या वेळी १,९६,७२६ इतके मतदान झाले होते. यंदा ते २,५१,६०६ झाले आहे. याचा अर्थ ५४,८५० मते येथून वाढली आहेत. संपूर्ण शहरी भाग असल्याने आणि भाजपाला मानणारा मतदार असला तरी राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि सुप्रिया सुळे यांनी या भागावर लक्ष केंद्रीत केले होते. मतदानामध्येही त्याचे प्रत्यंतर उमटलेले दिसले.

बारामती मतदारसंघात गेल्या वेळी २ लाख ९ हजार ९३७ मतदारांनी मतदान केले होते. यावेळी त्यामध्ये २८, ३४६ मतांची वाढ होऊन २,३८, २८३ इतके मतदान झाले आहे. यामध्ये जिरायती भागातील मतदानाचे प्रमाणही लक्षणीय आहे. निवडणुकीच्या काळात तापलेला येथील पाण्याचा प्रश्न मतदानात काय परिणाम करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दौंड हा कांचन कुल यांचा घरचा मतदारसंघ आहे. याठिकाणी गेल्या वेळी १, ५०, ७८१ मतदान झाले होते. गेल्या वेळीपेक्षा ३८, ४३५ म्हणजे १,८९,२१६ इतके मतदान झाले आहे. गेल्या वेळी येथून महादेव जानकर यांना २५,५४८ मतांची आघाडी मिळाली होती. यंदाच्या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस सावध पावित्र्यात होती. याशिवाय रासपला मानणारा समाजघटकही फारसा त्वेषाने उतरला नव्हता. त्यामुळे येथील वाढलेला टक्का कोणाला आघाडी देतोय हे पाहणे महत्वाचे आहे.