रायसोनी महाविद्यालयास ‘नॅक’ची ‘अ+’ श्रेणी

120

पुणे : वाघोली येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅशनल असेसमेंट अँड ऍक्रिडिएशन कौन्सिल-नॅक) ‘अ+’ श्रेणी प्राप्त झाली आहे. संस्थेत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता तपासण्यासाठी हे मूल्यांकन केले जाते. नॅकद्वारे केलेल्या मूल्यांकनात चार गुणांपैकी रायसोनी महाविद्यालयाने ३.३४ सीजीपीए गुण मिळवत ‘अ+’ श्रेणी मिळवली.

या मूल्यांकनामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, इनोव्हेशन, विविध उपक्रम, शिक्षणपद्धती याविषयीची माहिती समाज, विद्यार्थी, पालक आणि उद्योग क्षेत्राला मिळण्यास मदत होते. अभ्यासक्रम, शिकविण्याची-शिकण्याची पद्धती, संशोधन व विकास, इनोव्हेशन, पायाभूत सुविधा, विद्यार्थी-शिक्षकांचा सहभाग, नाविन्यपूर्ण उपक्रम, नेतृत्व व व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकास अशा विविध निकषांची पाहणी ‘नॅक’कडून केली जाते.

रायसोनी शिक्षण समूहाचे अध्यक्ष सुनील रायसोनी, संस्थेचे विश्वस्त अजित टाटिया यांनी या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. खराडकर व समन्वयक प्रा. अमोल भोई यांच्यासह विद्यार्थी, पालक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. आगामी काळात महाविद्यालय गुणवत्ता वाढीची ही परंपरा कायम ठेवेल व यापुढे संशोधनावर अधिक भर दिला जाईल, असा विश्वास अजित टाटिया यांनी व्यक्त केला.