भारत पुन्हा हल्ल्याच्या तयारीत : कुरेशी

136

कराची  : पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने केलेल्या बॉम्ब हल्ल्याच्या धक्क्यातून पाकिस्तानअद्याप सावरलेला नाही. भारत या महिन्यात आणखी एक हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची ठोस माहिती पाकिस्तानला मिळाली आहे, असं पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी म्हणाले. भारत या महिन्यात १६ ते २० एप्रिलदरम्यान हल्ला करेल, असा दावा कुरेशी यांनी केलाय.

पुलवामामध्ये १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या बसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यांनतर २७ फेब्रुवारीला हवाई दलाने कारवाई केली. पाकव्याप्त काश्मीरमधील बालकोटमध्ये दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने बॉम्ब हल्ला केला होता. या घटनेनंतर पाकिस्तान सतर्क आहे.

भारत पाकिस्तानवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार भारत १६ एप्रिल ते २० एप्रिलदरम्यान आणखी एक हल्ला करू शकतो, असं पाकचे परराष्ट्रमंत्री कुरेशी म्हणाले. तसंच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यासंदर्भात देशाला संबोधित करण्यासाठी तयार आहेत. आम्ही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला यासंदर्भात ईमेल करून काही प्रश्न केले आहेत. पण अद्याप भारताकडून कुठलेही उत्तर आलेले नाही, असं कुरेशी यांनी सांगितलं.