धार्मिक प्रतिकांची सात्त्विकता वाढवल्यास त्याचा भक्तांच्या साधना प्रवासावर सकारात्मक परिणाम होतो !

140

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘धार्मिक आणि आध्यात्मिक प्रतिके’ या विषयावरील संशोधन बोलोने, इटली येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !

प्रत्येक प्रतिक किंवा चिन्ह यातून सूक्ष्म स्पंदने प्रक्षेपित होत असतात. ही स्पंदने सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात. बहुतांश लोक त्यांच्या धर्माच्या प्रतिकांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांविषयी अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांच्या धार्मिक प्रतिकांमधून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्यास त्याची त्यांना जाणीव नसते. अशा नकारात्मक स्पंदनांचा भक्तांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. भक्तांची त्यांच्या धर्माच्या प्रतिकांवर श्रद्धा असते. या श्रद्धेमुळे त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीला गती प्राप्त होते. धार्मिक प्रतिकांच्या सात्त्विकतेमध्ये वृद्धी व्हावी, यादृष्टीने प्रयत्न केल्यास त्याचा भक्तांच्या साधना प्रवासावर सकारात्मक परिणाम होतो, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. मिलुटिन पॅनक्रॅट्स यांनी केले. ‘युरोपियन अकॅडेमी ऑफ रिलिजन’च्या २०१९ च्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते. ही आंतरराष्ट्रीय परिषद बोलोने, इटली येथे झाली. ४ ते ६ मार्च या कालावधीत आयोजित परिषदेत ६ मार्च या दिवशी हा शोधनिबंध सादर करण्यात आला. श्री. मिलुटिन पॅनक्रॅट्स यांनी परिषदेमध्ये ‘धार्मिक प्रतिके आणि त्यांच्या सूक्ष्म-परिणामांसंदर्भातील अध्यात्मशास्त्र’ या शोधनिबंधाचे सादरीकरण केले. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. मिलुटिन पॅनक्रॅट्स आणि श्री. शॉन क्लार्क हे त्याचे सहलेखक आहेत.

श्री. मिलुटिन पॅनक्रॅट्स पुढे म्हणाले की, धार्मिक प्रतिके विविध रूपात असू शकतात. यात वस्त्रे, प्रतिके, प्रतिमा, नाद इत्यादी अंतर्भूत असू शकतात. मूलतः धार्मिक प्रतिके कलात्मक चिन्हे असतात. भक्तांना ईश्‍वराशी अनुसंधान साधण्यास साहाय्य करणे, हे त्यांचे प्रमुख कार्य असते. अर्थात धार्मिक प्रतिकांमध्ये सात्त्विकता ग्रहण करणे आणि नकारात्मकता परतवून लावण्याची क्षमता असणे आवश्यक असते; मात्र वस्तूनिष्ठपणे मापन केल्यास सर्व धार्मिक प्रतिके या निकषांची पूर्तता करतात का ? हे अभ्यासण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या आध्यत्मिक संशोधन करणार्‍या गटातील सूक्ष्म स्पंदने ओळखण्याची क्षमता असलेल्या सदस्यांनी विविध धार्मिक प्रतिकांमधील सूक्ष्म स्पंदनांचे परिक्षण केले. त्याचबरोबर या सर्व धार्मिक प्रतिकांचा अभ्यास भूतपूर्व अणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी विकसित केलेल्या ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’ आणि ‘पॉलिकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी’ या आधुनिक प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्रे अन् प्रणाली यांच्या माध्यमातूनही करण्यात आला. या संशोधनातून आध्यात्मिक आणि धार्मिक प्रतिकांच्या संदर्भातील काही मूलभूत सूत्रे उलगडली.

अ. कोणत्याही प्रतिकाशी निगडित विशिष्ट सूक्ष्म स्पंदने कार्यरत असतात. या स्पंदनांची गटवारी उच्च सकारात्मक, सकारात्मक आणि नकारात्मक अशी करता येईल. अभ्यास केलेल्या धार्मिक प्रतिकांपैकी काही प्रतिके इतरांच्या तुलनेत अधिक सकारात्मक असल्याचे लक्षात आले. या व्यतिरिक्त एका प्रतिकाच्या आध्यात्मिक उपयुक्ततेवर पुष्कळ प्रमाणात प्रभाव करणारी अन्य आध्यात्मिक वैशिष्ट्येही नेमकेपणाने लक्षात आली.
आ. एक धार्मिक प्रतिक सात्त्विक असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यातील सात्त्विकता प्रयत्नपूर्वक वाढवण्यात आध्यात्मिक संशोधन गटाला यश मिळाले. एखाद्या प्रतिकामध्ये जितकी सात्त्विकता अधिक तितका त्याचा त्या प्रतिकाच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तीवरील सूक्ष्मातील परिणाम अधिक असतो.
इ. एखाद्या देवता तत्त्वाशी निगडित विविध प्रतिकांची (उदा. एखाद्या देवतेचे चित्र, यंत्र आणि रांगोळी) सूक्ष्म वैशिष्ट्ये एकसारखीच असतात.

अशा प्रयोगांतून एका दैवी तत्त्वाच्या वेगवेगळ्या आकारांतील प्रतिकांतील आध्यात्मिक सारखेपणा (सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावरील वैशिष्ट्ये) स्पष्ट होतो. हे त्या प्रतिकांचा संबंध एकाच दैवी तत्त्वाशी असल्यामुळे असते. त्यामुळे कलात्मक स्वातंत्र्य वापरून एखाद्या धार्मिक प्रतिकामध्ये कलात्मक पालट करण्याआधी कलाकारांनी पुष्कळ काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा त्याचे दूरगामी परिणाम समाजाला भोगावे लागू शकतात, असे लक्षात येते.