ज्येष्ठ मानसतज्ज्ञ रविवारी उलगडणार ‘मैत्र मनाचे’

157

डॉ. मोहन आगाशे, डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. विद्याधर वाटवे व बालाजी मंजुळे यांची उपस्थिती

पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जेष्ठ महिला मानसतज्ज्ञांचा ‘मैत्र मनाचे’ या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्या मुलाखतीही ऐकण्याची संधी मिळणार आहे. पुण्यातील सिग्मंड फ्रॉईड मेंटल हेल्थ रिसर्च अँड सायको अनॅलिसिस इन्स्टीट्यूट, इंडियन सायकिऍट्रिक सोसायटी, पुणे शाखा आणि पूना सायकिऍट्रिस्ट असोसिएशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 10 मार्च 2019 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत डॉ. शामराव कलमाडी (कर्नाटक) हायस्कुलचे सभागृह, एरंडवणे, पुणे येथे हा मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे.

या पुरस्कार सोहळ्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. विद्याधर वाटवे व सनदी अधिकारी बालाजी मंजुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. मानसशास्त्र आणि मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये आपापल्या योगदानातून शैक्षणिक पुस्तके, संशोधने, मानसशास्त्रीय उपचार तसेच मुलांची सर्वांगीण विकास पद्धती यात मोलाची कामगिरी करणार्‍या मान्यवरांचा प्रवास उलगडण्याबरोबरच त्यांचा सन्मान होणार आहे.

यंदाचा ‘मैत्र मनाचे’ पुरस्कार डॉ. उषाताई खिरे (प्रज्ञा मानस संशोधिका), प्रा. शामला वनारसे (साहित्य लेखन), डॉ. शुभा थत्ते (उपयोजित मानसशास्त्र), शोभाताई भागवत (विशेष योगदान), डॉ. सी. जी. देशपांडे व डॉ. आर. आर बोरुडे (शैक्षणिक), डॉ. पी. ए. भागवतवार (प्रशिक्षण) यांना जाहीर झाला आहे. डॉ. संज्योत देशपांडे व डॉ. शिरीष साठे या मान्यवरांच्या मुलाखती घेणार आहेत.  उलगडणार आहेत, अशी माहिती सिग्मंड फ्रॉईड मेंटल हेल्थ रिसर्च अँड सायको अनॅलिसिस इन्स्टीट्यूटचे संस्थापक- संचालक राजेश अलोणे यांनी दिली आहे.

मानसिक आरोग्य संवर्धन अलिकडच्या काळात महत्वपूर्ण गरज बनली आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या सर्व्हेक्षणानुसार भविष्यात भारत मानसिक आरोग्य समस्या असणार्‍या देशांच्या यादीत येणार आहे. अशा प्रकारच्या मानसिक आरोग्य सेवा देणार्‍यांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे सिगमंड फ्रॉइड मेंटल हेल्थ  इन्स्टिट्यूटद्वारे समाजात मानसिक आरोग्याबाबत जागृती करण्यासाठी मनोस्वास्थ्य संवर्धन गट विनामूल्य दर मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता भिडे आयुर्वेदिक संस्था, नवा विष्णू चौक, बाजीराव रोड येथे चालविला जातो. तसेच मानसिक आरोग्यामध्ये काम करणार्‍या व्यक्तींसाठी विविध मनोमापन आणि मनौपचार पद्धतीवर प्रशिक्षणे आयोजित केली जातात, असे राजेश अलोणे यांनी नमूद केले.