पर्यटनपंढरीत स्वच्छतेच्या गुढ्यांचा नारा

जल्लोष रॅली : स्वछता संदेश घराघरात पोचविण्याचा प्रयत्न

लोणावळा – “स्वच्छ सर्वेक्षण 2019′ मध्ये दोन वेगवेगळ्या विभागात नामांकण प्राप्त करणाऱ्या लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने सात मार्च रोजी “जल्लोष रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने संपूर्ण शहरात स्वच्छता संदेश देणाऱ्या गुढ्या उभारल्या जाणार आहेत. नागरिकांनी देखील आपापल्या घरापुढे स्वच्छतेची गुढी उभारावी, असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी लोणावळेकरांना केले आहे.

येत्या 6 मार्च रोजी दिल्ली येथे “स्वच्छ सर्वेक्षण 2019’च्या विजेत्यांच्या नावांची घोषणा होणार असून, मंत्री महोदयांच्या हस्ते सर्व विजेत्यांना परितोषिक वितरित करण्यात येणार आहे. या “स्वच्छ सर्वेक्षण 2019′ स्पर्धेत लोणावळा शहराला दोन विभागात नामांकने मिळाली आहे. आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार हे लोणावळेकरांच्या वतीने या पुरस्कारांचा स्वीकार करणार आहे. नगरपरिषदेला मिळालेले हे यश म्हणजे लोणावळ्यातील प्रत्येक नागरीकाने स्वच्छतेसाठी केलेल्या प्रयत्नाचा एकत्रित परिपाक आहे. पुरस्काराच्या रूपाने या प्रयत्नांना मिळालेल्या पोचपावतीचा आनंद प्रत्येकाला घेता यावा आणि त्यातून प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेबाबत भविष्यात आपल्या समोर वाढलेल्या जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी सात मार्च रोजी जल्लोष रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्षा जाधव यांनी दिली.

“जल्लोष स्वच्छतेचा, लोणावळेकरांच्या विजयाचा’ ही या रॅलीची “टॅग लाईन असणार असून, नगरपरिषदेच्या वतीने ज्या गुढ्या उभारण्यात येणार आहे त्यावर ही “टॅग लाईन’ झळकणार आहे. राम मंदिर, गवळीवाडा ते पुरंदरे ग्राउंड या दरम्यान आयोजित या रॅलीमध्ये सहभागी सर्व नागरिक पारंपरिक पद्धतीच्या वेशात सहभागी होणार आहे. शालेय मुले स्वच्छतेचा संदेश देणारे काही चित्ररथ सादर करणार आहे. शिवाय सात मार्च रोजी खास लोणावळा शहरासाठी सुप्रसिद्ध गायक शेखर याने गायलेल्या स्वच्छता गीताचे लोकार्पण ही करण्यात येणार आहे. या पुरस्काराची तसेच जल्लोष रॅली कार्यक्रमाची माहिती नागरिकांना देण्याकरिता आयोजित करण्यात आलेल्या सभेत उपस्थित नागरिकांनी नगराध्यक्षा जाधव, उपनगराध्यक्ष पुजारी आणि मुख्याधिकारी सचिन पवार यांचा सत्कार केला.

Pune Prahar

पुणे प्रहार

error: Content is protected !!