पुण्यात मते, मताधिक्‍य टिकविण्याचे भाजपपुढे आव्हान

81

– शेखर कानेटकर 

पुणे – भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची अखेर युती झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत नाही पण विधानसभा निवडणुकीत पुण्यातील आठ जागांपैकी काही जागांवर भाजपला पाणी सोडावे लागणार आहे, एवढे निश्‍चित. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यामुळे पुणे शहरातील आठही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने स्वतःचे उमेदवार उभे केले होते आणि त्यावेळच्या मोदी लाटेत आठही जण विजयी झाले होते.

आता पुन्हायुती झाल्याने व “फिप्टी-फिप्टी’ फॉर्म्युला ठरल्याने पुण्यातील कमाल चार जागा भाजपला शिवसेनेसाठी सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे कोत्या विद्यमान आमदारांना घरी बसवायचे हे आव्हान/डोकेदुखी पक्षनेतृत्वासमोर असणार आहे. ज्या विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी नाकारली जाईल ते पक्षनिष्ठा राखत शांत बसतात की हल्लीच्या प्रथेप्रमाणे पक्षांतर वा बंडखोरी करतात हा स्वाभाविक उत्सुकतेचा विषय राहील.

एक खासदार, आठ आमदार व अठ्ठ्याण्णव नगरसेवक असे डोळे दिपविणारे यश भारतीय जनता पक्षाला गेल्या तीन वेगवेगळ्या निवडणुकां मिळाले ते “मोदी प्रभाग’मुळेच. पण गेल्या साडेचार वर्षातील कारभार व जनतेतील वाढलेली नाराजी यामुळे हे यश “शतप्रतिशत’ टिकविणे वाटते तितके सोपे राहिलेले नाही.

गेल्या काही निवडणुकात पुण्यातील भाजपची मते वाढत आहेत, हे उघडपणे दिसते आहे. भाजपचा जुना अवतार असलेल्या भारतीय जनसंघाचे उमेदवार जगन्नथराव जोशी यांनी 1962 च्या लोकसभा निवडणुकीत अवघी 10 टक्के मते पडली होती. पण 1971 मध्ये जनसंघाचे उमेदवार असलेल्या रामभाऊ म्हाळगी यांची मते तिपटीने वाढून 32 टक्‍क्‍यांवर पोहोचली होती.

भाजपचे पुण्यातील पहिले उमेदवार (1984) जगन्नाथराव जोशी यांच्या मतात म्हाळगी यांच्यापेक्षा दहा टक्के घट होऊन ती 21-91 वर आली होती. त्याला कारण इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे कॉंग्रेसच्या बाजूने आलेली सहानुभूतीची लाट.

1989 मध्ये भाजपची पुण्यातील मते पुन्हा 42.2 टक्‍क्‍यांवर पोहोचली. 1991 मध्ये 43.8 टक्के मते पडून भाजपला पुण्यातील लोकसभेचा पहिला विजय मिळाला. पण 1996 व 98 च्या निवडणुकीत पक्षाची मते पुन्हा अनुक्रमे 39.38 व 38 टक्‍क्‍यांपर्यंत घसरली. 1999 च्या निवडणुकीत भाजपची मते पुन्हा 40 टक्‍क्‍यांवर जाऊन भाजपला दुसरा विजय मिळाला. अर्थात तो कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील मतविभागणीमुळेच.

भाजपला 2014 मद्ये मात्र भाजपला 57.36 टक्के मते मिळाली. ती अर्थातच मोदी लाटेमुळे. या निवडणुकीत भाजपला पुण्यातील मताधिक्‍याचा (3 लाख 15 हजार) विक्रमही नोंदविता आला. मते व मताधिक्‍य टिकविण्याचे आव्हान आता भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला पेलावे लागणार आहे.

पुण्यातून भाजपने आतापर्यंत एका उमेदवाराला दोनदाच संधी दिली आहे. अण्णा जोशी (1989, 1991) , प्रदीप रावत (1999, 2004) व अनिल शिरोळे (2009, 2014) हे ते उमेदवार. अण्णा जोशी 91 मध्ये विजयी होऊनही 1996 मध्ये त्यांना उमेदवारी नाकारली गेली. 2004 मध्ये रावत जिंकल्यावर त्यांना मात्र पुन्हा उमेदवारीची संधी मिळाली. अनिल शिरोळे यांना 2009 व 2014 मध्ये सलग दोनदा संधी मिळाली आहे. त्यामुळे अपवाद म्हणून शिरोळे यांना तिसऱ्यांदा तिकीट मिळणार की विजयी होऊनही अण्णा जोशींप्रमाणे ते कापले जाणार हा उत्सुकतेचा विषय आहे.

भारतीय जनता पक्षाला सध्या बरकतीचे दिवस आले आहेत. त्यामुळे पुणे शहर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी सध्या खूपजण इच्छुक आहेत. अगदी रस्सीखेच सुरू आहे. यावर्षी भाजपच्या पुण्यातील उमेदवारीची माळ कोणाच्याही गळ्यात पडो. पण त्या उमेदवार व नेतृत्वापुढे 2014 मध्ये मिळालेली विक्रमी मते व मताधिक्‍य निदान कायम ठेवण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. शिवसेनेबरोबर झालेल्या युतीमुळे काळजी निश्‍चित कमी झाली आहे. पण सेनेबरोबर झालेली कटुता विसरून सेनेचे कार्यकर्तेही शंभर टक्के कार्यरत होतील हेही पाहावे लागणार आहे.