दोन गाव एक शिवजयंती 

152

लोणी काळभोर (प्रतिनिधी) :  हवेली तालुक्यातील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन मोठ्या गावातील तरुणांनी एकत्र येऊन दोन गाव एक शिवजयंती  करण्याचे ठरवले असून त्याची बैठक आज लोणी काळभोरचे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ मंदिरात अतिशय उत्साही वातावरणात पार पडली. सर्व जाती धर्मातील लोकांनी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मुस्लिम समाज बहुसंख्येने मिरवणुकीत  सहभागी होणार असल्याचे जेष्ठ नेते रेहमान इनामदार यांनी सांगितले.

यावेळी बोलताना राजेश काळभोर  म्हणाले, आजकाल कुठल्याही महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करताना दुचाकीच्या सायलेन्सरची पुंगळी काढून पन्नास – शंभर दुचाक्या वेगाने पळवल्या जातात. कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवून नाच केला जातो. हि खरी शिवजयंती नाही. त्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार अंमलात आणणे हि खरी शिवजयंती आहे.  यावेळी युगंधर काळभोर, कमलेश काळभोर, सुर्यकांत गवळी, देविदास काळभोर, चित्तरंजन गायकवाड, संतोष भोसले,  दिलीप भोसले, संजय राखपसरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनी आपापले राजकीय जोडे बाजूला ठेवून शिवजयंती साजरी करण्यासाठी एकत्र यायचे असे यावेळी ठरविण्यात आले.

कवडीपाट टोलनाका ते लोणी काळभोर गाव अशी पारंपारिक वाद्यात व ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक  काढण्याचे नियोजन करण्यात आले. शिवजयंतीच्या दिवशी एखाद्या नामांकित शिवव्याख्यात्याचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. या वेळी उपस्थित सर्वांनी शिवजयंती साजरी करण्यासाठी दोन लाख रुपये वर्गणी अर्ध्या तासात गोळा केली. या वेळी मुस्लिम समाजाने पाच हजार रुपये वर्गणी जाहीर केली .यावेळी उपसरपंच ऋषी केश काळभोर , ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र काळभोर, भरत काळभोर, दिग्विजय काळभोर, विकास कदम वाईद शेख, रियाज इनामदार, शब्बीर पठाण व दोन्ही गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.