तालुक्यात जानेवारीतच पाणीबाणी

203

आष्टी | संतोष तागडे : तालुक्यात यंदा जानेवारीतच दुष्काळाची तीव्रता जाणवताना दिसत आहे.पशुधनाच्या चारा-पाण्याचा गंभीर जाणवत असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई आगामी उन्हाळ्यात आणखी वाढणार आहे.दरम्यान,पिण्याचे पाणी प्रश्‍न प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. तालुक्याची तहान भागविणाऱ्या जवळपास सर्वच प्रकल्पांनी मृतसाठा गाठल्याने पाणीप्रश्‍न आता एरणीवर असणार हे नक्की.

पशूधन जगवायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. तालुक्यातील विहिरी, तलाव कुपनलिकांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर घटली आहे.तालुक्यात दुष्काळ घोषित केला आहे.मात्र उपाययोजना अद्याप ज्या प्रमाणात सुरू व्हायला हव्यात त्या दिसत नाहीत. चारा-पाण्याचा प्रश्न आ वासून ऊभा असतानाही शासनदरबारी चारा-छावण्या सुरू होण्याच्या कुठल्याही हालचाली दिसत नसल्याचे चिञ आहे. येणाऱ्या काळात शहरवासियांची मदार टॅंकरवर असणार असे दिसून येत आहे.

चारा-पाणी उपलब्ध नसल्याने जनावरे  विकण्याची वेळ शेतक-यांवर आलेली आहे. तालुक्यातील विहिरी, तलाव, कुपनलिकांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर घटली असून अनेक ठिकाणच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. ग्रामीण भागात महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे विहिरीनी तळ गाठल्याने ज्या ठिकणी वहिरीस पाणी आहे येथे महिलांची गर्दी होत आहे   अनेक शेतकरी भाजीपाल्याचे पीक घेतात, परंतु यंदा पाणीच उपलब्ध नसल्याने भाजीपाला घेण्यावर मर्यादा आली आहे.

दुष्काळी परीस्थितीमुळे गावात काहीच काम उपलब्ध नसल्याने अनेक गावांतील युवक शहराकडे स्थलांतरित होऊ लागले आहेत. तालुक्यात कोरड्या प्रकल्पामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न येणाऱ्या काळात ऊग्र रूप धारण करणार आहे.

दुग्धव्यवसायावर मोठा परीणाम : यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे तालुक्यात अनेक शेतक-यांचा शेतीशी निगडीत असलेला जोडधंदा म्हणजे दुग्धव्यवयावर देखील दुष्काळाचा परिणाम झाला आहे जनावरांच्या चा-याच्या प्रश्नाबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवघड होत चालल्याने नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचे  चिञ दिसत  आहे.