‘धप्पा’ च्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार कुलकर्णी कुटुंब

80

आपल्या देशात अनेक पारंपारिक उद्योग, व्यवसाय क्षेत्रामध्ये संपूर्ण कुटुंब कार्यरत असल्याचे दिसते. याला चित्रपट क्षेत्र सुद्धा अपवाद नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि त्यांचे कुटुंबीय सिनेमा क्षेत्रात रंगले आहेत. मात्र संपूर्ण कुटुंब एकाच सिनेमात काम करत आहे, असे दिसत नाही. हा दुर्मिळ योगायोग आगामी ‘धप्पा’ या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे. प्रसिद्ध लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक गिरीश पांडुरंग कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंब म्हणजेच त्यांची पत्नी वृषाली आणि कन्या शारवी असे संपूर्ण कुलकर्णी कुटुंब एकत्र दिसणार आहेत.

विशबेरी फिल्मस् प्रस्तुत, इंक टेल्स आणि अरभाट फिल्म्स निर्मित, निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित, राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘धप्पा’ हा चित्रपट १ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त या चित्रपटाची कथा राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या गिरीश पांडुरंग कुलकर्णी यांची आहे हा सुद्धा एक वेगळा योग ‘धप्पा’ चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे, तसेच ते या चित्रपटाशी अभिनेते आणि सहनिर्माते अशा भूमिकेने जोडले गेले आहेत.

राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संरक्षण या विषयावरील ‘धप्पा’ मध्ये शारवी एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. आज स्कॉटलंड मध्ये बायो मेडिकल सायन्सचे शिक्षण घेत असलेल्या शारवीने यापूर्वी ‘वळू’, ‘विहीर’ व ‘देऊळ’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले तसेच सुमित्रा भावे यांच्या ‘आजी शरण येते’ या टेलीव्हीजनपटातही बालकलाकार म्हणून चमकली आहे.

वृषाली कुलकर्णी या प्रथितयश डॉक्टर असून छंद म्हणून अभिनय करतात. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत अभिनयाचे पारितोषिक मिळविणाऱ्या वृषाली यांनी ‘हायवे’, ‘बापजन्म’, तसेच आगामी ‘अश्लील ऊद्योग मित्रमंडळ’ या चित्रपटातही भूमिका साकारल्या आहेत. ‘हायवे’ चित्रपटातील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली होती. ‘धप्पा’ मध्ये त्या एका संवेदनशील लेखिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर गिरीश कुलकर्णी यांची व्यक्तीरेखा ही आपल्या मुलाच्या पाठीशी खंबीर उभे राहणाऱ्या आणि जगाशी झुंजायचे बळ देणाऱ्या वडिलांची आहे. या चित्रपटात कुलकर्णी कुटुंब एकत्र दिसणार असले तरी ते कथेमध्ये मात्र वेगवेगळ्या कुटुंबातील व्यक्तिरेखा आहेत. ‘धप्पा’ या चित्रपटाचे निर्माते सुमतीलाल शाह, सहनिर्माते गिरीश पांडुरंग कुलकर्णी आणि उमेश विनायक कुलकर्णी आहेत.