२०१९ मधील बहुचर्चित उत्कंठतावर्धक ‘ठाकरे’!

204

“हिंदुस्थानचे महानेता, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो…” अशा अंगावर शहारे आणणाऱ्या शब्दांनी आणि शानदार संगीतामुळे ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या टीझरने अवघ्या काही तासांत संपूर्ण जगात धुमशान घातले आहे. टिझर लाँच झाल्यापासूनच सगळ्यांनाच या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता लागून राहिलेली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा धगधगता निखारा म्हणून ओळखले जाणारे जगप्रख्यात व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें’. या गरजणाऱ्या वाघाला इतकी वर्षे जवळून पाहिल्यामुळे, “आज मी जे काही आहे ते फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच!” याची जाणीव बाळगून प्रख्यात पत्रकार, संसद सदस्य माननीय संजय राऊत यांच्या लेखणीतून साकारला गेलेला ‘ठाकरे’ हा २०१९ मधील बहुचर्चित व उत्कंठतावर्धक असा आगामी चित्रपट २०१९ च्या सर्वाधिक प्रलंबीत चित्रपटांपैकी एक आहे.

‘ठाकरे’ चित्रपटात आढळून येणारा अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी तंतोतंत बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखाच दिसत असल्यामुळे ‘ठाकरे’ नावाचं हे झंझावात वादळ प्रत्यक्ष रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. चित्रपटातील शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेसाठीची नवाझुद्दीन सिद्दीकीची निवड म्हणजे ‘हीरे की परख सिर्फ जोहरी ही जानता है।’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही. याबद्दल सांगताना संजय राऊत सांगतात की, “ठाकरे चित्रपटाच्या पहिल्या मीटिंगला नवाजला समोरून चालत येताना मी पाहिलं तेव्हाच तो बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी माझ्या डोळ्यात फिक्स झाला होता. नवाझ हा एक गुणी अभिनेता आहेच ह्या बद्दल काही वादच नाही. या चित्रपटासाठी त्याने आपलया इतर सर्व चित्रपटांच्या तारखा व शेड्युल देखील बदलले होते.” बाळासाहेबांची भूमिका साकारण्याच्या शिवधनुष्याचा भार पेलवण्याच्या विचारांत नवाझने त्याच्या अनेक रात्रं न झोपता काढल्या होत्या त्याबद्दल सांगताना तो म्हणतो की, “आपल्याला जगण्यासाठी एकच आयुष्य मिळतं आणि ह्या आयुष्यात मला ‘बाळासाहेब ठाकरें’ ची भूमिका साकारायला मिळाली ह्याचा मला खूप आनंद आहे. प्रत्येक अभिनेत्याचं एक स्वप्न असतं की अशा प्रकारच्या जगविख्यात व्यक्तीचा जीवनप्रवास त्यांच्या भूमिकेद्वारा आपल्याला जगण्यास मिळावा आणि मला ही संधी मिळाली ह्याबद्दल मी स्वतःला खूप नशीबवान मानतो.”

संजय राऊत यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून त्यासाठी त्यांना चार वर्षे लागली. १९६०च्या दशकातील जुनी मुंबई तसेच  तेजासम तळपणाऱ्या हिंदुहृदयसम्राटांची रोखठोक वृत्ती, स्पष्टवक्तेपणा, आक्रमकता, त्याग, संघर्ष दर्शवणाऱ्या भव्यदिव्य ‘ठाकरे‘ या आगामी चित्रपटाद्वारे सामान्य लोकांचा असामान्य आवाज पुन्हा एकदा आण्यासाठी सज्ज झालेला आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास एका चित्रपटात दाखवू शकत नाही. त्यामुळे या बायोपिकच्या सिक्वलचाही विचार केला असून त्याच्यावरही काम सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका खंबीर स्त्रीचा हात असतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा बुलंद आवाज असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंसारख्या वाघाला मीनाताई ठाकरेंसारख्या धीट, जिद्दी व खंबीर अशा वाघीणीची साथ मिळाली आणि महाराष्ट्राला मातृछाया मिळाली. बाळासाहेबांसारख्या ज्वलंत वादळाला साथ देणाऱ्या ह्या शीतल छायेची भूमिका अभिनेत्री अमृता राव साकारणार असल्यामुळे माँ साहेबांचा मराठमोळा साज असलेल्या वेशात अमृता कशी दिसते हे पाहण्यास खरी रंगत येणार आहे. भूमिकेबद्दल सांगताना अमृता म्हणते की, “जेव्हा निर्माते संजय राऊत आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी पहिल्यांदा मला भेटण्यास बोलावले तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘ठाकरे’ चित्रपटातील माँसाहेबच्या भूमिकेसाठीच्या शोधाची सुरुवात आणि शेवट तूच आहेस. माझ्या मागील कामांमुळे लोकांमते तयार झालेल्या माझ्या इमेजला पाहता ही भूमिका मला मिळाली. या गोष्टीचा मला फार अभिमान वाटतो कारण, मी नेहमीच माझी स्वतःची ओळख असलेल्या भूमिकांची निवड केलेली आहे. मी आजवर मला साकारायला मिळालेल्या विलक्षण भूमिकांमुळे स्वतःला खूप नशीबवान समजते. जर का मी आयुष्यात काही कमावलं असेल तर ते म्हणजे मिनाताईंसारख्या व्यक्तित्वाची भूमिका.”

आता जल्लोष तर होणारचं… ‘ठाकरे’ चित्रपटातील सर्वच गाणी इतकी उत्साहवर्धक आहेत की फार कमी वेळात त्यांनी करोडो लोकांच्या मनात घर केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरें वरील ‘आया रे ठाकरे..’ हे हिंदी गाणे आणि ‘आपले साहेब ठाकरे’ हे आल्हाददायी जोशपूर्ण स्वरांनी स्वरबद्ध केलेले मराठी गाणे म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसारख्या देशाला तुफानांपासून वाचवतं गरजणाऱ्या महाराष्ट्राच्या वाघाच्या व्यक्तित्वाप्रमाणेच जल्लोशपूर्ण, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक आहे. सामान्य लोकांचा असामान्य आवाज बनून जगभरात गरजणाऱ्या बाळासाहेबांस समर्पित केलेले ‘साहेब तू…’हे गाणे श्रोत्यांस बाळासाहेबांच्या काळाचे दर्शन घडवंत प्रत्येकाच्या काळजाला भिडते. मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या संगीत दिग्दर्शनाने राज्य गाजवणारी गोडजोळी रोहन- रोहन यांनी ही गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. ‘आया रे ठाकरे..’ हे गाणे पद्मश्री सुनील जोगी लिखित व नकाश अझीझ यांच्या आवाजात स्वरबद्ध केलेलं आहे. ‘आपले साहेब ठाकरे’ हे गाणे मंदार चोळकर लिखित व अवधूत गुप्तेच्या आल्हाददायी जोशपूर्ण स्वरांत तर ‘साहेब तू…’ हे मनोज यादव लिखित सुखविंदर सिंग यांच्या मधुर स्वरांनी स्वरबद्ध केलेले आहे. अहमद खान यांनी ‘आया रे ठाकरे ‘ या खास गाण्याची कोरियोग्राफी केली आहे.

संजय राऊत प्रस्तुत, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स, कार्निवल मोशन पिक्चर्स आणि राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी निर्मित ‘ठाकरे’ या येत्या २५ जानेवारी २०१९ ला जगभरात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातील नक्की कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळणार, बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातील कोणत्या पैलूंवर या चित्रपटात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे? असे अनेक प्रश्न उद्भवले आहेत. या प्रश्नांची रंजक उत्तरे शोधण्यासाठी पहा ‘ठाकरे’ येत्या २५ जानेवारीला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.