आणखी एका पोलिसाचा दगडफेकीत मृत्यू

47

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात आणखी एका पोलिसाचा जमावानं केलेल्या दगडफेकीत मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाझीपूरमधल्या सभेनंतर काही निदर्शकांनी त्या ठिकाणी दगडफेक सुरू केली. त्यातच या पोलीस शिपायाचा मृत्यू झाला.

जमावाच्या हिंसाचारात पोलिसाचा बळी जाण्याची उत्तर प्रदेशातली ही दुसरी घटना आहे. बुंदेलशहर भागात सुबोधकुमार सिंग या पोलीसाची काही जणांनी गोळ्या घालून हत्या केली होती. हे प्रकरण ताजं असतानाच आता गाझीपूरचं हे प्रकरण उघड झालं आहे.

सुरेश वत्स, असं गाझीपूर हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कॉन्सेबलचं नाव आहे. सुरेश प्रतापगड जिल्ह्यातल्या राणीगंजचे होते.

नरेंद्र मोदी यांची गाझीपूर भागात एक सभा झाली. या वेळी पंतप्रधानांसमोर निदर्शनं करण्यासाठी काही कार्यकर्ते जमले होते. त्यांना सभास्थळी जाण्यापासून पोलिसांनी रोखून धरलं होतं. गाझीपूरचे पोलीस अधीक्षक यशवीर यादव यांनी सांगितलं की, राष्ट्रीय निशाद पार्टीचे काही कार्यकर्ते निदर्शनं करत होते. त्यांना पोलिसांनी थोपवून धरलं होतं.

पंतप्रधानांनी गाझीपूर सोडताच या कार्यकर्त्यांनी रस्ते रोखून धरले आणि वाहनांवर दगडफेक सुरू केली. जमावाच्या हिंसाचाराचे तपशील मिळवण्यासाठी त्या भागातले सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहे. पोलीस हत्येप्रकरणी त्यानुसार 15 निदर्शकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.