पाटील इस्टेटमधील जळीतग्रस्तांना १० लाखांचे गृहपयोगी साहित्य

172

पुणे : दि मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त पाटील इस्टेट आगीतील पीडित कुटुंबीयांना १० लाखांच्या गृहपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये पाण्याचा पिंप, हंडा-काळाशी, पातेले, परात, चमचे असे गृहपयोगी साहित्याचा समावेश होता. एकूण ३०० कुटुंबाना हे साहित्य वाटण्यात आले.

मांगीरबाबा देवस्थान ट्रस्ट, जुना पुणे-मुंबई रस्ता, वाकडेवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमाला दि मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, रिपब्लिकन नेते परशुराम वाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे ऍड. अयुबभाई शेख, स्थानिक नगरसेविका सोनाली लांडगे, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, सचिव बाबुराव घाडगे, संजय कदम, माजी नगरसेवक अयाज काझी, संतोष लांडगे, स्थानिक कार्यकर्ते सुशील सर्वगोड, शोभा झेंडे, निखिल कांबळे, अमोल ओव्हाळ, महादेव साळवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. पी. ए. इनामदार म्हणाले, “सामाजिक जाणिव आणि कर्तव्य भावनेतून बँकेतर्फे हे कार्य होत आहे. गरिबीच्या चक्रातून बाहेर पाडण्यासाठी झोपडपट्टीतल्या मुलांनीही शिकले पाहिजे. व्यसनांपासून दार राहिले पाहिजे. स्वतःची प्रगती साधायची असेल, तर शिक्षणावाचून दुसरा तरणोपाय नाही, हे आपण लक्षात घ्यावे.”

डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “आग दुर्घटनेच्या दिवसापासून विविध स्तरांतून येथील नागरिकांना मदत केली जात आहे. परंतु, त्यांना पक्की घरे मिळायला हवीत. त्यासाठी पाठपुरावा करीत असून, लवकरच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत सर्वांना हक्काची घरे देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

महेश शिंदे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे यांनी पीडितांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष ठामपणे उभा असल्याचे सांगत जळीतग्रस्तांना आधार दिला. त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी पक्षाचे पदाधिकारी कोणतीही मदत कमी पडू देणार नाहीत, असे आश्वासनही दिली. याच भागातील नगरसेविका सोनाली लांडगे यांनीही आपण सदैव सोबत असल्याचे सांगितले. मदत मिळालेल्या नागरिकांनी दोन्ही संस्थांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.