शिरवळ येथे होणाऱ्या हिंदु राष्ट्र जागृती सभेनिमित्त वाहनफेरी

185

 हिंदु राष्ट्र्र-जागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरीला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

शिरवळ (जिल्हा सातारा) – सर्वत्रच्या हिंदूंमध्ये हिंदु राष्ट्राविषयी जागृती व्हावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी भव्य हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच उद्देशाने रविवार, २३ डिसेंबर २०१८ या दिवशी येथील ज्ञानसंवर्धिनी शाळेच्या पटांगणावरही हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचा विषय सर्वांपर्यंत पोहोचावा, यासाठी २२ डिसेंबर या दिवशी शिरवळ आणि परिसरात भव्य वाहनफेरी काढण्यात आली. या वाहनफेरीला १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

बालाजी विश्‍व सोसायटी (पळशी रोड) येथे या वाहनफेरीला हिंदु धर्माचे प्रतीक असणार्‍या धर्मध्वजाच्या पूजनाने आणि शंखनादाने प्रारंभ झाला. भगवे ध्वज आणि उत्स्फूर्त जयघोष यांमुळे संपूर्ण वातावरणात शौर्य आणि चैतन्य स्फुरल्याचे दिसून आले. शहाजी चौकात शेवटी फेरीचे रूपांतर छोट्या सभेत झाले. यावेळी काडसिद्धेश्‍वर संप्रदायाचे ह.भ.प.भानुदास महाराज, हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत मणेरीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि सर्वांना २३ डिसेंबर या दिवशी होणार्‍या सभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले.

शिरवळ येथे दुमदुमणार हिंदु राष्ट्राची हाक : छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साथीने याच परिसरातून हिंदवी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. या सुवर्ण इतिहासाचा मागोवा घेत पुन्हा एकदा हिंदूंचे व्यापक संघटन निर्माण होण्यासाठी छत्रपतींच्या इतिहासाचा वारसा लाभलेल्या शिरवळच्या पुण्यभूमीत हिंदु राष्ट्र जागृती सभा होणार आहे.

स्थळ : ज्ञानसंवर्धिनी शाळेचे मैदान, शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा

वार आणि दिनांक : रविवार, २३ डिसेंबर २०१८ वेळ : सायंकाळी ६ वाजता