अरुण बोंगिरवार यांच्या निधनाने कुशल प्रशासक हरपला : मुख्यमंत्री

77

मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार यांच्या निधनाने एक द्रष्टा आणि कुशल प्रशासक आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. बोंगिरवार यांना प्रशासकीय यंत्रणा व कार्यपद्धतीची अचूक जाण होती. या यंत्रणेचे खंबीरपणे नेतृत्त्व करतानाच तिचे लोकांप्रती असलेले उत्तरदायित्वही अधिकाधिक वाढावे यासाठी त्यांची धडपड होती. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळावर मात करण्याच्या दृष्टीने सुक्ष्म सिंचन प्रकल्पांसाठी त्यांचे प्रयत्न मोलाचे होते. राज्यात स्वतंत्र जलसंधारण विभागाच्या निर्मितीसाठीही त्यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. प्रशासकीय सुधारणांसोबतच राज्याच्या प्रशासनातला मराठी टक्का वाढावा यासाठीच्या त्यांच्या सूचना फलदायी ठरल्या आहेत. सामाजिक बांधिलकीपोटी निवृत्तीनंतरही ते विविध उपक्रमांच्या माध्यमातून सक्रीय होते.